लाहोर ः पाकिस्तानातील पंजाब प्रांतात असलेल्या ऐतिहासिक गुरूनानक महालाची काही उपद्रवी लोकांनी तोडफोड केल्याचा प्रकार घडल्याचे वृत्त पाकिस्तानातील वृत्तपत्र ‘डॉन’ने सोमवारी प्रकाशित केले होते, तसेच या महालातील महागड्या खिडक्या आणि दरवाजे विकल्याची माहितीही यामध्ये देण्यात आली होती, परंतु हा महाल शिखांशी संबंधित वास्तू असली तरी शीख समुदायाचे पवित्र स्थान नसून त्या ठिकाणी बाबा गुरूनानक यांनी वास्तव्य केले नसल्याची माहिती आता समोर आली आहे. दरम्यान, डॉन वृत्तपत्राने कोणत्याही तत्त्थ्यांची पडताळणी न करता अशा प्रकारचे वृत्त प्रकाशित केले असून हे बेजबाबदार वृत्त असल्याची प्रतिक्रिया लेखक आणि इतिहासकार अमरदीप सिंह यांनी दिली. अमरदीप सिंह हे पाकिस्तानातील शिखांच्या ऐतिहासिक वास्तूंचे अभ्यासक म्हणून परिचित आहेत. डॉनने दिलेल्या वृत्तात या वास्तूच्या मालकी हक्काबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे.
माथेफिरू तरुणाकडून चाकूहल्ला
नवी दिल्ली ः जपानमध्ये आज सकाळी एका व्यक्तीने जवळपास 20 लोकांवर चाकूने हल्ला केला. मंगळवारी सकाळी झालेली ही घटना जपानमधील कावासाकी येथील एका पार्कबाहेर घडली. अचानक झालेल्या या हल्ल्यात एकूण 19 जण जखमी झाले असून यात 13 शाळकरी मुलींचा समावेश आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये एका ज्येष्ठ व्यक्तीचा आणि लहान मुलाचा समावेश आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या हल्ल्यानंतर पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. हल्लेखोराकडून दोन चाकूही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
‘काँग्रेसजनांच्या डोक्यात केमिकल लोचा’
नवी दिल्ली ः गुजरातमधील आमदार आणि ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेस पक्ष आणि नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. वारंवार घोटाळा झाला आहे, असा आरोप करणार्या काँग्रेस नेत्यांच्या डोक्यात केमिकल लोचा झाला आहे, असा टोला अल्पेश ठाकोर यांनी लगावला. अल्पेश ठाकोर गेल्या महिन्यात काँग्रेस पक्षातून बाहेर पडले होते. क्षत्रिय ठाकोर सेनेचा पक्षात अनादर केला जात असल्याने आपण बाहेर पडत असल्याचे त्यांनी सांगितले होते. अल्पेश ठाकोर यांनी या वेळी काँग्रेस पक्षात लोक नाही तर चमचे भरले आहेत, असेही म्हटले आहे. लोकांना नेमके काय हवे आहे हे समजण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. ते वारंवार नुसता घोटाळा झाला आहे, अशी आरडाओरड करीत आहेत. कोणताही घोटाळा झालेला नाही. त्यांच्या डोक्यात घोटाळा आहे. त्यांच्या डोक्यात केमिकल लोचा आहे, अशी खरमरीत टीका अल्पेश ठाकोर यांनी केली आहे.