Breaking News

राहीचा ‘सुवर्ण’वेध; ऑलिम्पिक प्रवेश निश्चित

म्युनिक : वृत्तसंस्था

भारताच्या राही सरनोबतने जर्मनीत सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजीत सुवर्ण पदकाची कमाई केली. राहीने महिलांच्या 25 मीटर्स पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या कामगिरीने राहीला 2020 मधल्या टोकिओ ऑलिम्पिकचं तिकीट मिळवून दिलं आहे. 25 मीटर्स पिस्टल प्रकारातून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी ती पहिलीच भारतीय नेमबाज ठरली. सोमवारी झालेल्या अंतिम सामन्यात तिने चमकदार कामगिरी करत एकूण 37 निशाणे साधले. अर्जुन पुरस्कार विजेत्या कोल्हापूरच्या राहीने याआधी 2013 सालच्या चँगवन विश्वचषक नेमबाजीतही सुवर्ण पदकाची कमाई केली होती. आशियाई खेळांमध्ये नेमबाजीत सुवर्ण पदक जिंकणारी राही ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. म्युनिक विश्वचषकात तीन सुवर्ण पदक जिंकून भारत आता अव्वल स्थानावर आहे. तर चीन एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदकासह दुसर्‍या स्थानावर आहे. विश्वचषकात रविवारी अपूर्वी चंडेलाने महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. तर पुरुषांच्या गटात सौरभ चौधरीने सोमवारी दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई करत विश्वविक्रम प्रस्थापित केला.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply