Breaking News

शेतकर्यांपर्यंत सुविधा पोहोचवा

पालकमंत्र्यांचे निर्देश; अलिबागमध्ये खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

अलिबाग : जिमाका

यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्‍यांना अधिकाधिक उत्पादन घेता यावे व उत्पादन वाढ व्हावी, यासाठी शेतकर्‍यांपर्यंत तंत्रज्ञान व सुविधा पोहोचवा, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि.29) येथे दिले. रायगड जिल्ह्याची सन 2019 च्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय अभयसिंह शिंदे इनामदार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बंकट आर्ले, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ सुभाष म्हस्के, आरसीएफचे विपणन अधिकारी एस. आर. काटकर, जिल्हा अग्रणी बँकेचे आनंद निंबेकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता डी. आर. पाटील आदी उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर भात पिकाच्या लागवडीचे नियोजन असून यंदा एक लाख चार हजार 600 हेक्टर क्षेत्र भात पिकाखाली असेल. त्याखालोखाल सहा हजार 755 हेक्टरवर नागली, चार हजार 600 हेक्टरवर इतर तृणधान्य, 1400 हेक्टरवर तूर, 1040 हेक्टरवर इतर कडधान्य असे एकूण एक लाख 18 हजार 395 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. या खरीप पिकांच्या पेरणीनंतर उत्पादन वाढीसाठी 24 हजार 860 मे.टन रासायनिक खतांचे आवर्तन मंजूर करण्यात आले असून ही खते उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले. तसेच पिकांवरील रोगराई निवारणासाठी सहा हजार 197 लिटर कीटकनाशके व बुरशीनाशकांची उपलब्धता करण्यात आली आहे. बियाणे व अन्य कृषी निविष्ठांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर दोन तर प्रत्येक तालुकास्तरावर एक याप्रमाणे एकूण 17 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शेळके यांनी सादरीकरण केले.

भातपिकासाठी पिककर्ज

कृषी आयुक्तालयाने भात पिकाकरिता 49 हजार रुपये प्रति हेक्टरी पिककर्ज दर ठरविला आहे. संकरित व बासमती भाताकरिता 55 हजार 100 रुपये प्रति हेक्टर दर निश्चित केले आहेत. तर जिल्हास्तरीय समितीने सर्वप्रकारच्या भाताकरिता 55 हजार रुपये प्रति हेक्टरी कर्जदर मंजूर केला आहे,अशी माहिती देण्यात आली.

उत्पादन वाढीसाठी शेतीशाळा

सन 2019-20 मध्ये भातपिकवरील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला व्यवस्थापन (क्रॉप सॅप) अंतर्गत शेतीशाळा भरविण्यात येत आहेत. रोहिणी पंधरवाडा ते मृग नक्षत्र कालावधीत या शेतीशाळा जिल्ह्याभरात 276कृषी सहाय्यकामार्फत किडरोग सर्वेक्षण व सल्ला व्यवस्थापन अंतर्गत निवड केलेल्या गावामध्ये भरविल्या जात आहेत.

रायगड जिल्ह्यातील पिके, पशूंविषयी पूरक माहिती

रायगड जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र सहा लाख 86 हजार 892 हेक्टर इतके आहे. त्यात पिकाखालील निव्वळ क्षेत्र दोन लाख एक हजार 322 इतके असून, एक लाख 48 हजार 694 हेक्टर क्षेत्र जंगलाखाली आहे. शेतीसाठी उपलब्ध क्षेत्रापैकी खरीप हंगामात साधारणपणे एक लाख 41 हजार 200 हेक्टरवर लागवड होते, तर 21 हजार 100 हेक्टरवर रब्बी व सुमारे सात हजार हेक्टरवर उन्हाळी हंगामातील पिकांची लागवड होते. रायगड जिल्ह्यात गोजातीय जनावरे चार लाख पाच हजार 840 इतके आहेत. म्हैसवर्गीय जनावरे एक लाख 26 हजार 686 आहेत. तब्बल एक लाख 25 हजार 89 शेळ्या मेंढ्या असून, इतर जनावरे चार हजार 753 आहेत. जिल्ह्यात एकूण सहा लाख 62 हजार 368 पशुधन आहे. या पशुधनासाठी वार्षिक एक लाख 25 हजार 620 मे.टन चार्‍याची आवश्यकता असून एक लाख 37 हजार 848 मे.टन चार्‍याची उपलब्धता आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 3201.2 मि.मी असून गेल्यावर्षी 2796 मि. मी. इतके म्हणजेच 87.34 टक्के पर्जन्यमान झाले होते.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply