Breaking News

बोरिवली ग्रामपंचायतची टंचाईमुक्तीकडे वाटचाल

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील बोरिवली ग्रामपंचायत हद्दीमधील आदिवासी भागात नळपाणी योजना असूनदेखील तेथे कायम पाण्याची समस्या जाणवत आहे. ग्रामपंचायतीने टंचाई जाणवत असलेल्या पाच ठिकाणी बोअरवेल खोदून पाणी उपलब्ध करून घेतले असून, त्या सर्व ठिकाणी वीज पंप लावून पाणी उचलण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण बोरिवली ग्रामपंचायत पाण्याच्याबाबतीत स्वयंपूर्ण होत आहे.

बोरिवली ग्रामपंचायत हद्दीतील सहा गावे आणि सात वाड्यांसाठी जीवन प्राधिकरणने नळपाणी योजना राबविली आहे. मात्र ग्रामपंचायत हद्दीतील अंजप, सराईवाडी, गुडवणवाडी, पिंगळेवाडी, सुगवे शाळा परिसरात पाणी मिळत नाही. त्या ठिकाणी  बोअरवेल खोदून पाण्याची टंचाई दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. भूषण पेमारे यांनी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना या पाणीटंचाईकडे लक्ष देण्याची विनंती केली. त्याचवेळी पेमारे यांनी आपल्या सहकार्‍यांना, आर्थिक मदत एकत्र करून बोअरवेल खोदून ग्रामस्थांचे पाण्यासाठी सुरू असलेले हाल दूर करू, असा विश्वास दाखविल्यानंतर अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. एका बोअरवेलसाठी मुंबईमधील पालवी फाउंडेशननेदेखील मदत केली. मात्र पाणीटंचाई असलेल्या सराईवाडी, पिंगळेवाडी आणि गुडवणवाडी येथे बोअरवेल खोदणारी गाडी जाण्यात अडचणी असल्याने रस्ता करण्यापासून तर आर्थिक मदत गोळा करण्याची कामे भूषण पेमारे आणि राजेंद्र क्षीरसागर यांनी आपल्या मित्रांसह केली. त्यामुळे अनेक दाते समोर आले आणि बोरिवली ग्रामपंचायतीमधील गावे-वाड्यांमधील पिण्याची समस्या दूर करण्यात यश आले आहे.

सुगवे गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या आणि पीएनपी शाळेच्या परिसरात खोदलेल्या बोअरवेलला 280 फुटावर पाणी लागले आहे. तर पिंगळेवाडी येथे 250 फूट खोदल्यानंतर बोअरवेलला पाणी लागले आहे. सर्वाधिक पाणीटंचाई असलेल्या गुडवणवाडी येथे बोअरवेल खोदण्याचे काम केले असता 210 फुटावर पाणी लागले असल्याने तेथील आदिवासींनी आनंद साजरा केला. या ठिकाणी बोअरवेल खोदण्यासाठी मुंबई येथील पालवी संस्थेने आर्थिक मदत केली आहे. सराईवाडी येथे 190 फूट खोदल्यानंतर बोअरवेलला पाणी लागले असून, अंजप गावातील बोअरवेललाही भरपूर पाणी लागले आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply