Breaking News

पहिली ते आठवीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी टिलीमिली मालिका

एमकेसीएल कॉलेज फाऊंडेशनचा पुढाकार

पनवेल : रामप्रहर वृत्त – राज्यातील पहिली ते आठवीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर टिलीमिली ही मालिका 20 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती एमकेसीएलचे कोकण विभाग समन्वयक जयंत भगत यांनी दिली आहे. याचा फायदा कोकणातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

एमकेसीएल नॉलेज फाऊंडेशन या संस्थेने पुढाकार घेऊन हा प्रकल्प तयार केला असून, राज्यातील दीड कोटी विद्यार्थ्यांना या मालिकेमुळे शिकण्याची संधी निर्माण झाली आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यातील शाळा बंद आहेत. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र इंटरनेट कनेक्टिविटी, स्मार्टफोन आणि तत्सम साधने उपलब्ध होण्यातील अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणात अडचणी आहेत. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालक आणि विद्यार्थी चिंतेत आहेत. या भूमीवर ’एमकेसीएल नॉलेज फाऊंडेशन’ या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेने पहिली ते आठवी इयत्तांच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ’सह्याद्री वाहिनीवर दैनंदिन मालिकेद्वारे मोफत देण्याचे ठरवले आहे. विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन मालिकेचे नाव टिलीमिली ठेवण्यात आले आहे.

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रक्षेपित होणारी ही टिलीमिली मालिका विद्यार्थ्यांना त्यांच्या घरच्या, शेजारच्या किंवा परिसरातल्या दूरचित्रवाणीवर पाहता येईल. ही मालिका ’बालभारती’च्या पहिली ते आठवी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांतील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर आधारित असेल. त्यात व्याख्याने न देता मुलांना घरी आणि परिसरात करून बघता येतील, अशा कृतिनिष्ठ उपक्रमांचा समावेश आहे. रोज प्रत्येक इयत्तेचा एका विषयाचा एक पाठ याप्रमाणे प्रत्येक इयत्तेचे साठ दिवसात साठ भागांद्वारे सादर केले जातील. प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शनिवार असे सहा दिवस हे भाग सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित

करण्यात येतील. त्यामुळे टिलीमिली ही मालिका सलग दहा आठवडे प्रसारित केली जाईल. मराठी माध्यमाव्यतिरिक्त मराठी समजणार्‍या इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांनाही ही मालिका  उपयुक्त ठरेल.

मालिकेत विद्यार्थ्यांना स्वच्छ, आनंदी वातावरण, भावनिक सुरक्षितता असेल. चुका करत स्वतःची अर्थबांधणी स्वतःच करण्याचे स्वातंत्र्य दिलेले असेल. असे केल्याने मुले हसत खेळत स्वतःच कशी शिकतात, हे मालिकेच्या प्रत्येक भागात बघायला मिळेल. अशी सहज आनंददायक व ज्ञानदेवादी प्रक्रिया उलगडत राहिल्याने मुलांना मालिका रोज स्वतः करण्याची स्फूर्ती देईल, पालकही त्यात सहभागी होऊ शकता. मालिकेचे आठही इयत्तांचे मिळून 480 भाग 20 जुलै ते 26 सप्टेंबर या कालावधीत प्रसारित केले जातील.

-जयंत भगत, समन्वयक, कोकण विभाग, एमकेसीएल.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply