Breaking News

नेरळमध्ये भरतो आंब्यांचा बाजार

फणसवाडीमधील 30 आदिवासी कुटुंबे 30 वर्षांपासून व्यवसायात

कर्जत : बातमीदार

सध्या आंब्यांचा सिझन असून आदिवासी लोकांकडून आंब्याची पाटी घेण्यासाठी चोखंदळ ग्राहक नेरळ बाजारपेठमधील त्या आंब्यांच्या बाजारात भेट देतात. नेरळ परिसरात असलेल्या फणसवाडी येथील आदिवासी बांधव गेली 30 वर्षे आंबे विक्री करीत असतात. त्यांच्याकडे खात्रीने गोड आंबे मिळत असल्याने त्यांचा व्यवसायदेखील तितकाच खात्रीने सुरू असून, त्यावर त्या आदिवासींची कुटुंबेदेखील उदरनिर्वाह करीत आहेत.

नेरळजवळील फणसवाडीमधील आदिवासी लोक गेली 30 वर्षे नेरळ बाजारपेठ भागातील जुन्या बाजारपेठ मध्ये आंब्यांच्या पाट्या घेऊन व्यवसाय करतात. त्यातही या महिला आपल्या कुटुंबाचा आधार बनल्या असून त्या आदिवासी कुटुंबातील पुरुष मंडळी खोपोली येथे जाऊन आंबे खरेदी करून आणतात. तर काहीवेळा आंब्याच्या बागेतील झाडे विकत घेऊन त्या झाडावरील आंबे काढून विक्रीसाठी आणण्याचे काम पुरुष मंडळी करीत असते.अशाप्रकारे व्यवसाय करणार्‍या फणसवाडीमधील आदिवासी लोकांकडून खात्रीशीर आंबे मिळत असल्याने त्यांचा व्यवसाय वर्षानुवर्षे सचोटीने सुरू ठेवला आहे. त्यांच्याकडे असलेल्या टोपलीत ज्याप्रमाणे नेरळच्या जुन्या बाजारपेठमध्ये आंबे विक्रीचा व्यवसाय चालतो, अगदी त्याहून अधिक मेहनत कधी कधी आपला व्यवसाय वाढविण्यासाठी मग या महिला डोक्यावर चार डझन आंब्याची टोपली घेऊन नेरळ गावातील लोकवस्ती भागात जाऊनदेखील व्यवसाय करतात.अशा व्यवसायातून फणसवाडी मधील आदिवासी महिला आपले कुटुंब चालविण्यासाठी पुरुषांना मदत करतात.

एप्रिलपासून जून अशा तीन महिन्याचे काळात नेरळच्या जुन्या बाजारपेठ भागात आंब्यांची बाजारपेठ फुलते. फणसवाडीमधील 30 हून अधिक महिला आपल्या पाट्या घेऊन दिवसभर बसून असतात, त्यावेळी विक्रीसाठी आंबे आणण्याचे काम पुरुष मंडळी आणि काही महिला करीत असतात. रात्री आंबे घेऊन येण्याचे ते काम गोमा निर्गुडा, प्रकाश होले, गणपत होले, हासू होले, हासू निर्गुडा, आदी मंडळी करीत असतात. तर मंगल निर्गुडा, शेवंता कांबडी, सुशीला होले, कविता शिंगवा, शोभा आगीवले, भावना आगीवले, भारती आगीवले, रेखा होले, दामिनी कांबडी, पिंकी सांबरी, सुरेखा ठाकूर या महिला दिवसभर बसून आंब्याची विक्री करतात.

25-30 महिला दररोज नेरळच्या या आंब्यांच्या बाजारपेठ मध्ये प्रत्येकी 5 ते 7 पेट्या म्हणजे 30-35 डझन आंबे यांची विक्री करतात. हा व्यवसाय या आदिवासी लोकांना आपले कुटुंब चालविण्यासाठी मदत करीत असतो. दुसरीकडे नेरळच्या जुन्या बाजारपेठमध्ये हा व्यवसाय करणार्‍या फणसवाडीमधील महिलांना त्या ठिकाणी व्यवसाय करणारे कोणीही व्यापारी अडवत नाहीत.त्याचवेळी तेथील व्यापारी घेवरचंद जैन हे 30 वर्षे त्या आदिवासी लोकांना शिल्लक राहिलेल्या आंब्याच्या पेट्या ठेवून देण्यासाठी आपली जागा देतात.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply