एमटीडीसी हॉलिडे होमला टंचाईच्या झळा
कर्जत : बातमीदार
माथेरानमधील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला अतिरिक्त पाणी पुरवठा करणारा सिमसंस टॅन्क या तलावाने तळ गाठला आहे. येथील हॉलिडे होमसाठी एमटीडीसीने टँकरने पाणी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र माथेरानमध्ये वाहनबंदी असल्याने एमटीडीसी हॉलिडे होमला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
कमी दर असल्याने माथेरानमधील एमटीडीसी हॉलिडे होमला पर्यटक पहिली पसंती देतात. जीवन प्राधिकरणाकडून येथील एमटीडीसी हॉलिडे होमला पाणी पुरवठा केला जातो. मात्र फक्त दोन तास पाणी पुरवठा होत असल्याने हा पाणी पुरवठा अपुरा ठरतो. त्यामुळे एमटीडीसीने नगरपालिकेचा सिमसंस टॅन्क भाडेतत्वावर घेतला आहे. या तलावातून दरवर्षी जून महिन्यापर्यंत पाणी पुरवठा होत होता, पण यावर्षी जून महिन्याला 20 दिवस बाकी असतानाच या तलावाने तळ गाठला आहे.
या टंचाईवर मात करण्यासाठी एमटीडीसीने टँकरचे पाणी घेण्याचे ठरविले, मात्र वाहनबंदी असल्याने माथेरानमध्ये टँकर येऊ शकत नाही. त्यामुळे येथील एमटीडीसी हॉलिडे होमवर पाण्याचे मोठे संकट आले आहे. सिमसंस तलावाच्या वरच्या बाजूला घोडे बांधले जातात. पावसाच्या पाण्याबरोबरच लिद आणि घाण वाहून येत असल्याने तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे.नगरपालिकेनेसुद्धा हा तलाव गेली तीन वर्षे साफ केला नसल्याने गाळामुळे पाणी कमी साठले होते.