Breaking News

पाली पोटल कालव्याची दुरुस्ती कधी पूर्ण होणार?

कडाव : प्रतिनिधी

राजनाला कालवा हा कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी  वरदान ठरला आहे. हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आल्यामुळे राजनाला कालव्याच्या परिसरातील शेतकरी भाताचे दुबार पीक घेतात, मात्र मागील चार-पाच वर्षांपूर्वी या कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर या कामातील अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे काम यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या कालव्याला अनेक ठिकाणी खांडी गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.  

कर्जत तालुक्यातील भिवपुरी टाटा कॅम्प जलविद्युत प्रकल्पाद्वारे बाहेर येणारे पाणी सुमारे 50-55 वर्षांपासून कालव्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत येते. त्यामुळे हा संपूर्ण परिसर नेहमी हिरवागार असतो. परिसरात फार्म हाऊसधारकांची संख्या वाढल्याने स्थानिकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. या राजनाल्याचे डावा कालवा, उजवा कालवा आणि पालीपोटल कालवा असे तीन भागांत विभाजन झाले आहे. डाव्या-उजव्या कालव्याची लांबी 31 किलोमीटरपेक्षा जास्त असून हा मोठा कालवा आहे, तर पाली पोटल कालव्याची लांबी नऊ किलोमीटर असून तो छोटा कालवा आहे.

पाली पोटल कालव्यामुळे भिवपुरी, हुमगाव, पाली, पोटल, आंबोट आणि भालिवडी येथील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली येत आहे. त्यामुळे येथील शेतकरी वर्षानुवर्षे दुबार भातपीक लागवड करून आपला उदरनिर्वाह करीत आहे, मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून या कालव्याची दुरुस्तीची कामे अनेक ठिकाणी अर्धवट पडून आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना दरवर्षी उन्हाळ्यात शेतीला पाणी घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. या नाल्याच्या पोटनाल्यांची कामेही जागोजागी शिल्लक असून, साकवांची कामे झाली नाहीत, तसेच दरवर्षी पावसाळ्यात वाढणारी झाडेझुडपे काढण्याचे काम वेळेवर होत नसल्याने शेतीला पाणी येण्यासाठी उशीर होतो. परिणामी शेतकर्‍यांच्या कामाचे नियोजन कोलमडत आहे.

पाली पोटल कालवा हा शेतकर्‍यांसाठी वरदान ठरला असून, पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठीही महत्त्वाचा ठरला आहे, मात्र गेल्या काही वर्षांपासून या कालव्याच्या दुरुस्तीची कामे रखडली आहेत.

-दीपक श्रीखंडे, माजी सदस्य, कर्जत पंचायत समिती

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply