संपूर्ण जगात पर्यटन हा विषय आवडीचा बनला आहे. शाळेच्या सुट्ट्या अथवा शनिवार, रविवार लागून आलेल्या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी एखाद्या आवडत्या ठिकाणी जाऊन तेथील निसर्गाचा आनंद लुटणे हा भारतासह इतर देशात सुद्धा आवडता उपक्रम बनला आहे.परदेशात पर्यटकांना सुरक्षा पोहोचवणारे कडक कायदे अंमलबजावणीसुद्धा होत असते. त्यासाठी त्याचे काटेकोर नियम व त्याचे पालनसुद्धा होत असते. परंतु भारताची विशाल लोकसंख्या असल्याने सर्वच ठिकाणी लक्ष देणे प्रशासनाला कठीण बनले आहे. यासाठी पर्यटकांचे रक्षण करणारे काटेकोर नियम व कडक कायद्याची अपेक्षा सर्वच ठिकाणाहून व्यक्त होताना दिसत आहे.
मुरूड तालुक्यातील समुद्रकिनारे पर्यटनांसाठी मुरूड व काशीद प्रसिद्ध असून समुद्र किनारा अडीच किलोमीटर लांबीचा आहे. येथे वर्षामध्ये पाच लाखाहून अधिक पर्यटक येत असतात.सन 2014 मध्ये पुणे येथील अबिद इनामदार महाविद्यालयातील विद्यार्थी पाण्यात पोहण्यात उतरले व नाहक 14 विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले होते. तद्नंतर मुरूड येथील समुद्र किनारी फक्त टेहळणी मनोरे बसवले गेले तर नगर परिषदेकडून जीव रक्षकांची नियुक्ती करण्यात आली परंतु इतर कोणत्याही सुविधा येथे देण्यात आलेल्या नाहीत.त्यामुळे अशा समुद्र किनारी वारंवार घटना घडत आहेत. विस्तीर्ण असे समुद्र किनारे सुरुच्या वृक्षांच्या बागा यामुळे पर्यटकांना या ठिकाणी यावेसे वाटेत परंतु त्यांच्या जीविताच्या रक्षणासाठी उपाययोजना नसल्याने नाहक मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. मुरुड या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे परंतु डॉक्टर संख्या व आरोग्यविषयक पुरेशी साधने नसल्याने 48 किलोमीटर लांब अलिबाग येथे रुग्णांना हलवावे लागते त्यामुळे तिथेच रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. वर्षाला पाच लाख पर्यटक ज्या ठिकाणी येतात त्यामुळे विविध लोकांना उत्पन्न मिळते. अनेक तर्हेचा कर रूपाने महसूल घेतला जातो परंतु पर्यटकांच्यासाठी कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे पर्यटकांचे नाहक जीव जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
ज्या ठिकाणी पर्यटक येतात त्या ठिकाणी म्हणजेच मेरीटाइम बोर्डाचे अधिकारी अथवा कोणताही कर्मचारी उपस्थित राहत नाही. बोटीत बसणार्या पर्यटकांची संख्या किंवा त्यांनी लाइफ जाकीट घातले की नाही अथवा उत्कृष्ट स्वीमर आहे की नाही याची तपासणी बोट सुटण्यापूर्वी अथवा पाण्याचे गेम खेळण्यापूर्वी होणे आवश्यक असताना अशी पाहणी होतच नाही. त्यामुळे मालकांचे चांगलेच फावले असून अतिरिक्त पर्यटक घेऊन जाण्याचे धाडस वाढले असून पैसे कमवण्याच्या लालसेपायी अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे अधिकारी शासनाचा पगार घेतात परंतु शनिवार रविवार पर्यटकांची गर्दी असतानासुद्धा समुद्र किनारी थांबत नाहीत. जेव्हा एखादी दुर्दैवी घटना घडते तेव्हा असे लोक धावत येतात परंतु अशा अधिकारी वर्गावर कार्यवाही न झाल्याने बोर्डाचे अधिकारी निर्ढावले असून पर्यटकांच्या जीवाशी खेळत आहेत. मेरीटाइम बोर्डाचे बंदर निरीक्षक हे पद मुख्य असून त्याच्या हाताखाली असणार्या स्टाफने या गोष्टी हाताळाव्याच्या असतात, परंतु अधिकारीच उपस्थित न राहिल्यामुळे पर्यटकांच्या जीविताकडे दुर्लक्ष होत आहे.
कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंद यांचे स्मारक असून हे पाहण्यासाठी बोटीमधून काही मिनिटाचा प्रवास करावा लागतो. परंतु या ठिकाणी प्रत्येक प्रवाशांनी लाइफ जाकीट घातल्यावरच त्यांना स्मारकावर नेले जाते. परंतु याच्या उलट सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर शिडाच्या बोटींमधून जाताना पर्यटकांना कोणतेही लाइफ जाकीट घातले जात नाही त्यामुळे पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे झाली असून दुर्घटना घडण्याअगोदरच उपाययोजना करण्याचा विसर प्रशासनाला पडला आहे. त्यातच मोठा अजब प्रकार येथे पहावयास मिळत आहे. 25 मे रोजी सर्व बोट वाहतूक संपूर्ण महाराष्ट्रात बंद करण्यात आली आहे. परंतु महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डच्या अलिबाग येथील प्रादेशिक कार्यालयातून राजपुरी येथील शिडांच्या बोटीला हवामान चांगले असेल तेव्हा बोट जंजिरा किल्ल्यावर नेण्याची अट अगदी सहज देण्यात येऊन पावसातसुद्धा किल्ल्यावर जाण्याची मुभा देण्यात आल्याने मेरीटाइम बोर्डाच्या या गलथान कारभाराचे सर्वत्र हसे होताना दिसत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पावसाळी हंगामात किल्ल्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. परंतु या वर्षीचा अजब फतवा काढल्याने मेरीटाइम बोर्डाला पर्यटकांच्या जीवाची काळजीच नाही हे अभिप्रेत होत आहे.एक तर मेरीटाइम बोर्डाचे अधिकारी पर्यटकांची सुरक्षा पाहण्यासाठी हजर राहत नाही तर मग ऐन पावसाळ्यात बंद असणार्या बोटी सुरु करून पर्यटकांचे रक्षण कसे होणार हा मोठा प्रश्न येथे उपस्थित झाला आहे.
आता घडलेली पॅराशूटची घटना ही बंदर निरीक्षक यांना या समुद्रात अनधिकृतपणे वाहनाच्या साह्याने चालवण्यात आलेल्या बेकायदेशीर हवेत उडवणारी घटना गेले पाच वर्षांपासून मुरुड समुद्र किनारी अव्याहतपणे सुरु होती परंतु येथील बंदर निरीक्षक यांना सदरची घटना माहीत असूनसुद्धा दुर्लक्ष केले व एका पर्यटकाला नाहक जीव गमवावा लागला. समुद्र किनारी कोणतेही वाहन चालू नये असा नियम आहे. कारण समुद्र किनारी असंख्य पर्यटक येत असतात. समुद्रात सकाळी व संध्याकाळी वॉकिंगसाठी व फिरण्यासाठी खूप पर्यटक येतात हे मुरुड नगर परिषदेला माहीत असूनसुद्धा चारचाकी वाहनांना बंदी करण्याचे धाडस मुरुड नगर परिषदसुद्धा दाखवू शकली नाही. यासाठी सुट्टीच्या अशा शनिवार व रविवारी नगर परिषदेचे कर्मचारी तैनात असणे खूप आवश्यक असताना या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. जेव्हा पर्यटकांचा मृत्यू होईल अशावेळी अशा अधिकारी वर्गावर सुद्धा गुन्हे दाखल झाल्याशिवाय समुद्र किनारी पर्यटकांची निष्काळजीपणा करण्याचे धाडस कोणताही अधिकारी करणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. पॅराशूटमधून पडून एका मुलाचा मृत्यू झाला तेव्हा महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन टोपोनो यांनी कार्यरत असणार्या बंदर निरीक्षक यांना जाब विचारणे आवश्यक होते परंतु टोपोनी यांनी कोणतीही कार्यवाही न करता उलट बंदर निरीक्षक यांनाच संरक्षण दिले. वास्तविक पाहता बंदर निरीक्षक यांच्या हद्दीत बेकायदेशीर पॅराशूट चालत असल्याने झालेल्या प्रकाराला ते जबाबदार होते. परंतु पर्यटकांच्या मरणाकडे अधिकारी वर्ग फारसे मनाला लागून घेत नसल्याने बेकायदेशीर धंधेवाले फोफावले असून पर्यटकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत आहेत.
मुरुड व काशीद समुद्र किनारी ज्या पर्यटकांच्या बनाना बोटिंग व पाण्यावर चालणारे सर्व खेळाचे गेम यांना मेरीटाइम बोर्डाकडून परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु चारचाकी गाडीने आकाशात पॅराशूट चालवणार्यांना आम्ही परवानगी देत नाही. कारण चारचाकी गाड्यांचे लायसन्स हे आरटीओ पाहत असते त्यामुळे अशा पॅराशूटला आम्ही परवानगी देत नाही. काही समुद्रकिनारी असा गैरप्रकार सुरु आहे परंतु जेव्हा आम्ही अशा लोकांना पकडण्यास जातो तेव्हा हे लोक पळून जातात असा आमचा अनुभव आहे. याबाबत आम्ही मुरुड नगर परिषद मुख्याधिकारी यांनासुद्धा भेटून मुरुड समुद्रकिनारी असणार्या समुद्रात प्रवेश करणार्या जेट्ट्या बांधण्यात आलेल्या आहेत त्यांना लोखंडी खांब लावण्याची विनंतीसुद्धा केली होती. जेणेकरून समुद्रात कोणत्याही चारचाकी गाड्या फिरकणार नाहीत. परंतु येथेसुद्धा मुख्याधिकारी यांनी दुर्लक्ष केले आहे. समुद्रात चालणार्या सर्व खेळासाठी आम्ही परवानगी देत असतो असा खुलासा या वेळी मुरुडचे बंदर निरीक्षक हितेंद्र बारापत्रे यांनी केला आहे. त्याच प्रमाणे बारापत्रे यांनी सांगितले की, जे सर्व स्पोर्ट्स गेम पाण्यात चालतात त्यांना पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी लाइफ जॅकेटची सक्ती असते. पाण्यात जाण्याच्या अगोदरच त्यांना लाइफ जाकीट घालून मगच पाण्यातील खेळ खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच स्पोर्ट्स गेम्सचे लायसन्स घेणार्यांना सर्व बोटींवर एक उत्कृष्ट स्विमरची नियुक्त करण्याची सक्तीसुद्धा करण्यात आली आहे.
शासकीय अधिकारी यांनी काळजी न घेतल्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत.ज्यांना रक्षणाची जबाबदारी दिली आहे तेच दुर्लक्ष करीत असतील तर अशा अधिकार्यांना अशा दुर्घटनेला जबाबदार धरावे व त्यांच्यावरसुद्धा सहआरोपीचे गुन्हे दाखल झाल्याशिवाय प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा होणार नाही, अशी मागणी लोकांकडून होत आहे.
-संजय करडे, खबरबात