पनवेल : वार्ताहर
दरवर्षी जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत सिडकोतर्फे नवी मुंबईतील सिडको अधिकार क्षेत्रातील नागरिकांकरिता आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येतो, परंतु महाराष्ट्रातील सर्व प्राधिकरणांना संपूर्ण वर्षभर आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्याचे आदेश मा. मुंबई उच्च न्यायालयातर्फे पारित करण्यात आल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन निवारण कक्षाच्या धर्तीवर सप्टेंबर, 2018 पासून सिडकोतर्फेही आपत्कालीन निवारण कक्ष पूर्ण वर्षभर 24द7 तत्त्वावर सुरू ठेवण्यात येत आहे. पावसाळ्याच्या कालावधीतील संभाव्य आपत्ती, दुर्घटना लक्षात घेता जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत सिडकोतर्फे स्थापित आपत्कालीन नियंत्रण कक्षात अतिरिक्त सेवा व खबरदारी घेण्यात येत आहे.
सीबीडी-बेलापूर येथील सिडको भवनच्या तळ मजल्यावर असलेला हा नियंत्रण कक्ष कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांसहित शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशीही 24 तास कार्यरत राहील. या कक्षामार्फत आपत्कालीन स्थितीत अभियांत्रिकी विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, सुरक्षा विभाग, उद्यान विभाग आदी महत्त्वाच्या विभागाचे कर्मचारी 24 तास संपर्कात असतील.
आपात्कालीन कक्षाला नागरिक फोन, व्हॉटसप किंवा ई-मेलद्वारे माहिती किंवा तक्रार नोंदवू शकतात. त्यासाठी पुढील दूरध्वनी व व्हॉटसप क्रमांक तसेच ई-मेल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दूरध्वनी क्र. 022-6791 8383/8384/8385, 27562999, टोल फ्री क्र.1800226791, व्हॉटसप क्र.8879450450, फॅक्स क्र.002-67918199, ई-मेल शेललळवलेळपवळर.लेा
नागरिकांमार्फत फोनवरून अथवा व्हॉट्सपवरून माहिती अथवा तक्रार प्राप्त झाल्यावर नियंत्रण कक्षातील अधिकारी तातडीने निर्णय घेऊन ज्या नोडमध्ये सदर घटना घडली असेल तेथील प्रमुख अधिकार्यास घटनेसंबंधी माहिती कळवतील व त्यासंबंधी योग्य ते मार्गदर्शन करतील, तसेच नियंत्रण कक्ष आवश्यक असलेल्या अग्निशमन केंद्र, हॉस्पिटल, वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस अशा संबंधित विभागाशी तातडीने संपर्क साधून घटनास्थळी आवश्यक ती मदत ताबडतोब पोहोचविण्याची दक्षता घेईल. नागरी संरक्षण दल तसेच सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक यांचेही सहकार्य याकामी घेण्यात येणार आहे. नोडल अधिकारी, सर्व संबंधित सिडकोचे विभाग, तसेच इतर शासकीय विभाग यांच्याशी समन्वय साधण्याची महत्त्वाची भूमिका हा नियंत्रण कक्ष पार पाडेल. त्या घटनेसंबंधी केलेल्या कारवाईची माहिती व सद्यस्थिती नोडल अधिकारी नियंत्रण कक्षास पुरवणार आहेत. सदर माहिती नियंत्रण कक्षाकडून संपर्क साधलेल्या नागरिकांना दिली जाईल. दगडखाणी आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या जागांवर धोक्याच्या सूचना देणारे फलक लावण्यात येणार आहेत. अपघातप्रवण जागांवर सिडकोचे सुरक्षा रक्षक तैनात ठेवले जाणार आहेत, तसेच धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे. अतिवृष्टीच्या वेळी पाणी साठल्यास पाण्याचा उपसा करणारी यंत्रसामग्री 24 तास उपलब्ध करून देण्यात येणार आहे.