Breaking News

महापालिका हद्दीतील श्वान निर्बिजीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी

पनवेल, कामोठे : प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिका हद्दीत नवीन पनवेलमध्ये असलेले सिडकोचे श्वान निर्बिजीकरण केंद्र महापालिकेला हस्तांतरण केल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकार्‍याअभावी बंद आहे. पनवेल महानगरपालिका  हद्दीत वाढणार्‍या श्वानांच्या संख्येमुळे हे नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी महासभेत पशुवैद्यकीय अधिकार्‍याची नेमणूक करण्याची मागणी केल्यावर आयुक्तांनी लवकरच केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली.     

नवीन पनवेलमध्ये भुयारी मार्गाच्या रस्त्यावर असलेले श्वान निर्बिजीकरण केंद्र इंडिफेन्स ऑफ अ‍ॅनिमल ही संस्था चालवत होती. त्याचा खर्च सिडको देत होती. पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर नवीन पनवेलमधील श्वान निर्बिजीकरण केंद्राचा ताबा पनवेल महानगरपालिकेकडे देण्याचा निर्णय सिडकोने 2017 मध्ये घेतला. त्याचा खर्च परवडणारा नसल्याने महापालिकेने सुरुवातीला ते ताब्यात घेतले नाही म्हणून हे केंद्र काही महिने बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर सिडकोने संस्थेला मुदतवाढ दिली होती. या ठिकाणी श्वान पकडून आणून त्यांचे निर्बिजीकरण केले जाते, तसेच जखमी श्वानावर उपचार केले जातात. नंतर त्यांना जेथून पकडून आणले तेथे सोडले जाते. पनवेल महानगरपालिका हद्दीत हे एकमेव केंद्र आहे.

पनवेल पंचायत समितीच्या आवारात महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन केंद्र पनवेल व उरण तालुक्यासाठी आहे. त्यामध्ये सहायक आयुक्त, एक विकास अधिकारी व शिपाई असे तीन कर्मचारी मंजूर असताना त्या ठिकाणी पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे येथे शेतकर्‍यांचे पशुधन गाई-म्हशी, बकर्‍या व कोंबड्या यावर येथे  उपचार केले जातात. महिन्याला सरासरी 400 प्राण्यांवर उपचार केले जातात. येथे कर्मचारी कमी आणि उपलब्ध कर्मचार्‍यांकडे अतिरिक्त पदभार असल्याने त्यांना उपचारासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.

पनवेल महापालिका हद्दीतील भटक्या श्वानांची  संख्या वाढत आहे. काही ठिकाणी पिसाळलेल्या श्वानांनी हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे  श्वानांचे निर्बिजीकरण करणे आवश्यक आहे. जखमी व पिसाळलेल्या श्वानांवर उपचार होणे गरजेचे आहे.  महापालिकेने ते लवकरच सुरू करावे यासाठी नागरिकांनी व प्राणीमित्रांनी आवाज उठवणे गरजेचे आहे.

– पनवेलमध्ये भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक ठिकाणी या श्वानांनी हल्ला केल्याने लहान मुले जखमी झाल्याच्या घटना घडल्या असल्याने  श्वान निर्बिजीकरण केंद्र महापालिकेने सुरू ठेवणे गरजेचे आहे. मी महासभेत अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी नेमून ते सुरू करण्याची मागणी केली आहे. आयुक्तांनी ते मान्य केले आहे.

-अ‍ॅड. मनोज भुजबळ, नगरसेवक

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply