दुधानेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी; अनेकजण गंभीर जखमी
पाली : प्रतिनिधी : सुधागड तालुक्यातील दुधानेवाडी येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यात महिला व पुरुषांसह 30 जण जखमी झाले आहेत. दोन्ही गटांनी परस्परविरोधात दिलेल्या तक्रारीवरून पाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
परळी ग्रुपग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी (दि. 6) राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेसंदर्भात सरपंच संदेश कुंभार, उपसरपंच दीपक गायकवाड व गाव कमिटी यांच्या उपस्थितीत बैठक लावण्यात आली होती. वाद झाल्याने सदर बैठक स्थगित करण्यात आली. त्यानंतर फिर्यादी राजेश रमेश दुधाने यांनी (दि. 7) रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महेश ठाकूर यांनी व त्यांच्या सहकार्यांनी राजेश दुधाने व त्यांच्या सहकारी व कुटुंबीयांना दमदाटी व शिविगाळ करुन काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. राजेश दुधाने यांच्या फिर्यादीवरुन महेश ठाकूर, चंद्रकांत ठाकूर, भगवान दुधाने, रंजना ठाकूर, मनिषा खैरे भारती दुधाने, ज्योत्स्ना ठाकूर, संदीप लहाने यांच्याविरोधात पाली पोलीस ठाण्यत भा.द.वी कलम 143, 147,149,324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी परळी ग्रामपंचायत सदस्य महेश चंद्रकांत ठाकूर यांनी (दि. 8) रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सदर बैठक आम्हाला न विचारता लावली या रागातून सुनिल दुधाने व त्यांच्या इतर साथीदारांनी त्यांना धक्काबुक्की देत लाकुड, दगड व दांडक्यांनी मारहाण केली. तसेच ठाकूर यांच्या स्वीफ्ट डिझायर गाडीची मागील काच व उजव्या बाजूच्या दरवाजाचा पत्रा तोडून नुकसान केले. महेश ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनिल दुधाने, चेतन दुधाने, वैभव दुधाने, केतन दुधाने, महादू दुधाने, सुरेश दुधाने, संदीप दुधाने, सागर दुधाने, दशरथ दुधाने, सुनिता दुधाने, मंगलेश दुधाने, उज्वला दुधाने, अर्चना दुधाने, राहूल अजिवले, प्रिया दुधाने, अनिता दुधाने, गणेश दुधाने, शेखर दुधाने, संतोष दुधाने, मंदा दुधाने, सुरेखा दुधाने व चव्हाण (सर्व रा. दुधानेवाडी) यांच्यावरोधात भा.द.वी कलम 143, 147,149,324, 323, 504, 506, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार नरेश जाधव करीत आहेत.