या डिजिटल इंडियामुळे किती बदल झाला आहे नाही. काही सेकंदात तुम्हाला तुमचा बोर्डाच्या परीक्षेचा निकाल समजतो. नाही तर 90च्या दशकापर्यंत एसएससीच्या निकालाचे किती अप्रूप असायचे. या निकालानंतर त्याच्या किंवा तिच्या पुढील शिक्षणाची दिशा ठरत असे आजच्यासारख्या इतर परीक्षा देण्याची गरज नसे. मे महिना संपत आला की बोर्डाच्या कार्यालयात कोणाची ओळख मिळते का हे शोधून आपल्या पाल्याचा निकाल मिळवण्याचे प्रयत्न सुरू व्हायचे. जाहीर होण्यापूर्वी निकाल समजला, तर केवढा आनंद व्हायचा. आपण एव्हरेस्ट शिखर सर केल्यासारखे वाटायचे.
बोर्डाने निकालाची तारीख जाहीर केल्यावर विद्यार्थ्यांच्या बरोबरच पालकांच्या हृदयात धडधड सुरू व्हायची. निकालाची तारीख जवळ येईल तशी हृदयात धडधड वाढायची. त्यात मग ज्याला ओळखीने निकाला समजला असेल तो आपल्या मित्रमंडळींवर छाप टाकण्यासाठी या वर्षी निकाल बोर्डाने थोडा कडक लावलाय, पण आमचा मुलगा मात्र पास झालाय हो असे सांगून इतरांच्या हृदयात धडधड वाढवायचे काम करायचे. त्यावेळी ही निकालामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होता. बोर्डाच्या कार्यालयातील दलाल पकडून अनेक नापास विद्यार्थी पास झाल्याची उदाहरणे आहेत. काही विद्यार्थ्यांचे हुशार पालक आपल्या मुलाला अवघड गेलेला पेपर कोठे तपासायला गेला आहे याची महिती शाळेतील सूत्रांकडून मिळवून त्या ठिकाणी पोहचून पेपर लिहिण्याचा पराक्रमही करीत असत जे विद्यार्थी शाळेत कायम नापास होत ते अशा पद्धतीने चांगले गुण मिळवून पास झाल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळायची.
जून महिन्यातील निकालाच्या तारखेच्या आदल्या दिवशी त्यावेळी बोर्डाकडून प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षण अधिकार्यांच्या कार्यालयात जिल्ह्यातील सर्व शाळांचा निकाल येत असे. तो आणण्यासाठी शाळेतील शिक्षक किंवा क्लार्क जात असत. सायंकाळी ते एसटीने गावात येईपर्यंत त्यांची पावसात वाट पाहत सगळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक स्टँडच्या आजूबाजूला उभे असत. गाडी आली की प्रत्येक जण उतरणार्या प्रवाशांकडे पाहत असायचा आपला निकाल आणायला गेलेली व्यक्ती त्यामध्ये नाही हे पाहिले की पुन्हा बाजूला जात असे. त्यावेळी मोबाईल नसल्याने त्यांना उशीर झाला की बेचैनी वाढलेली असायची.
रात्री उशिरा गाडीतून निकाल आणायला गेलेली व्यक्ती आल्यावर त्याच्या भोवती झुंबड उडत असे त्याच्या जवळ ओळख असलेले पालक त्याला विचारत मग तो शाळेचा निकाल किती लागला आणि पहिला कोण आला याची माहिती त्यांना सांगायचा. ते एकून आपले काय झाले असेल याचा विचार करीत धडधडत्या छातीने सगळे त्याच्या बरोबर शाळेत जायचे. तोपर्यंत गावात निकाल आल्याची माहिती पोहचल्याने मुख्याध्यापक, शिक्षक, संस्थाचालक, पालक आणि विद्यार्थी शाळेत धावत पळत येत. पहिला निकाल शाळेच्या मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांना दाखवल्यावर पहिले तीन क्रमांक कोण आले त्यांची नावे काढली जात. त्यावेळी आजच्यासारखी गुणांची खिरापत नव्हती. केंद्रातील इतर शाळांचा निकाल किती लागला, पहिला किती टक्क्यांना आला याची माहिती संस्थाचालकांना दिली जात असे. मग विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल दाखवला जात असे एसएससीचा निकाल आणि वाट पाहण्यातील ती हुरहूर, पास झाल्याचा होणार आनंद वेगळाच असे. दुसर्या दिवशी सकाळी गुणपत्रिका मिळत असे.
या निकालासोबत बोर्डाच्या गुणवत्ता यादीत आलेले, प्रत्येक विषयात पहिले आलेल्यांची यादी असलेली आणि सर्व शाळांचे निकाल असलेली पुस्तिका असे त्यामुळे सगळी माहिती मिळत असे. त्यावेळी शाळांच्यातही चुरस असल्याने ही माहिती आवर्जून पाहिली जात असे. आज बोर्डाने गुणवता यादीच बंद केली. वेबसाईटवर निकाल लागल्यानंतर काही दिवसानी ओरिजनल मार्क लिस्ट मिळते. पूर्वी बोर्डाकडून गुणवत्ता यादी वर्तमानपत्रांना दिली जायची. त्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती प्रसिद्ध व्हायच्या त्यामध्ये मी रोज एवढे तास अभ्यास केला, किती प्रश्न पत्रिका सोडवल्या, विजयाचे श्रेय कोणाला आणि मला कोण व्हायचे आहे याची माहिती असायची. जयंत म्हसकरसारख्या महापालिकच्या शाळेत शिक्षण घेणार्या गरीब कुटुंबातील मुलाला पहिला आल्यावर लोकसत्ताच्या तत्कालीन संपादक असलेल्या माधव गडकरीनी मदत मिळवून देऊन मुंबईत घर मिळवून दिले होते. आता गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे बंद करण्यात आले आहे. प्रत्येक शाळेत फक्त त्यांचाच निकाल असतो. प्रत्येक जण आपल्या मोबाईलवर क्षणात निकाल पाहतो त्यामुळे निकालाची ती वाट पाहण्यातील हुरहूर अनुभवायला मिळत नाही. ती अपूर्वाई ही संपली असल्याचे जाणवायला लागले आहे.
आज हे सगळे आठवायचे कारण म्हणजे शनिवारी संध्याकाळी एका पत्रकार मित्राचा फोन आला आज दहावीच्या परीक्षेचा निकाला लागला. पनवेलमधल्या पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मागत होता. त्याला सांगितले निकाल वेबसाईटवर असल्याने प्रत्येक शाळा फक्त त्यांच्या शाळेचा निकाल डाऊनलोड करते. त्यामुळे शहरात पहिल्या क्रमांकाने कोण उत्तीर्ण झाले ते सांगता येणार नाही.
-नितीन देशमुख (7875035636)