सोलापूर ः प्रतिनिधी
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. या मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे या दुसर्यांदा प्रतिनिधित्व करीत असताना भाजपने चांगलीच आघाडी घेतली आहे.
नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा फटका बसणार नाही, असा विश्वास बाळगणारे काँग्रेसचे उमेदवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघात चांगलाच फटका बसला. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्या या मतदारसंघात त्यांची मुलगी आमदार प्रणिती शिंदे या दुसर्यांदा प्रतिनिधित्व करीत असताना भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना या मतदारसंघातून 39,508 इतके मताधिक्य मिळाले आहे.
काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक़ प्रचारात हा मतदारसंघ पिंजून काढला. विविध कामांतून आमदार शिंदे यांनी मतदारांशी सतत संपर्क ठेवला. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला तारेल असा सर्वांना विश्वास होता. विशेष म्हणजे हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, पण सेना-भाजप नगरसेवकांनी मिळून काम केल्याचा चांगला परिणाम दिसून आला. भाजपपेक्षा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभा या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर झाल्या, पण या मतदारसंघातील राजकीय स्थित्यंतरामुळे मतदारांनी भाजपला कौल दिल्याचे दिसून आले. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी वंचित बहुजन आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याही या मतदारसंघात प्रचार सभा झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे नेते राज ठाकरे यांच्याही सभा झाल्या, मात्र या सभांना झालेली गर्दी मतांत परावर्तीत होऊ शकली नाही. या मतदारसंघातील प्रचाराची सर्व यंत्रणा स्वत: आमदार प्रणिती शिंदे यांनी हाती घेतली होती. त्यादृष्टीने त्यांनी नियोजन केले. गृहभेटीवर भर दिला, पण तरीही मतदारांनी येथे भाजपला साथ दिली.