Breaking News

खोपोली नगरपालिकेच्या मालमत्ता कर वाढीला नगरसेवकांचा विरोध

खोपोली : प्रतिनिधी

येथील नगरपालिका प्रशासनाने मालमत्ता करात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शासनाचा आदेश नसताना व स्थायी समितीला अंधारात ठेवत परस्पर घेण्यात आलेल्या या मालमत्ता कर वाढीला नगरसेवकांकडून विरोध केला जात आहे. नगरसेवक किशोर पानसरे यांनी मालमत्ता कर वाढीचा निर्णय तातडीने रद्द करण्यासाठी आवाज उठवला आहे.

मालमत्ता कर वाढविण्याची मागणी नगरसेवकांनी केलेली नाही. सर्वसाधारण सभेत असा विषय चर्चेला आला नाही. शासनाकडूनही कोणताही आदेश नाही.स्थायी समितीलाही विश्वासात घेण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रशासनाचा हा निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणारा नाही. मालमत्ता कर वाढीचा निर्णय कोरोना व आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या नागरिकांचा संताप वाढविणारा असल्याने तो तातडीने रद्द होण्याची गरज आहे, असे नगरसेवक पानसरे यांनी खोपोली नगरपालिका प्रशासनास दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

नगरसेवक पानसरे यांनी या पत्राची प्रत राज्याचे नगरविकास सचिव तसेच रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांना दिली आहे. दरम्यान, या मालमत्ता कर वाढीबाबत मुख्याधिकारी गणेश शेटे यांची प्रतिक्रिया संपर्क न झाल्याने मिळाली नाही.

Check Also

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपच्या निरंजन डावखरेंची विजयी हॅट्ट्रिक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार …

Leave a Reply