Breaking News

दादासाहेब फाळके चित्रनगरी कात टाकतेय!

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ ही सुमारे 55 वर्षांपूर्वी मंत्रालय आणि विधिमंडळातील कामकाजाचे वार्तांकन करणार्‍या, राजकीय पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांची संघटना कृ. पां. सामक, बाळ देशपांडे, पी. के. नाईक, व्ही. के. नाईक, तिवारी आदी पत्रकारांनी स्थापन केली. सुवर्ण महोत्सव पूर्ण केलेल्या या संघटनेने अनेक विषय हाताळले. अनेक कामे केली.

जम्मू-काश्मीर, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश आदी ठिकाणी पत्रकारांचे दौरे झाले. पर्यटनाबरोबरच अभ्यासही पत्रकारांना करता आला. विद्यमान अध्यक्ष दिलीप सपाटे यांच्या नेतृत्वाखाली नुकताच एक दौरा मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे काढण्यात आला होता. चित्रपटसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांचे नाव या चित्रनगरीला देण्यात आले असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. साधारणपणे दुपारी बारानंतर सुरू झालेल्या या अभ्यास दौर्‍याची सांगता संध्याकाळी पाचच्या सुमारास झाली. या साधारण पाच तासांत महाराष्ट्र चित्रपट नाट्य आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (मर्यादित)चे उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा यांनी त्यांच्या सर्व सहकार्‍यांसह प्रत्येक ठिकाणी फिरून तसेच भविष्यात कशा प्रकारे काम करण्यात येणार आहे आणि कोणकोणते प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत याची एका पडद्यावर माहिती दिली. सध्या गाजत असलेल्या बाळूमामाच्या नावानं चांगभलं, विठू माऊली, बिग बॉस मराठी आणि हिंदी, तारक मेहता का उल्टा चष्मा, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिका तसेच ‘एक थी रानी, एक था रावण’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी जाऊन माहिती करून घेण्यात आली. विठू माऊलीमधील पुंडलिकाच्या भूमिकेतील कलाकारासमवेत, दिग्दर्शकासमवेत उत्साहात छायाचित्रेही काढण्याचा मोह पत्रकारांना आवरला नाही. स्वराज्य रक्षक संभाजीच्या सेटवर भाले काय, तोफ काय मग तुळजाभवानी मंदिर असो प्रत्येक ठिकाणी जाऊन ती ती छायाचित्रे काढून या स्मृती जतन करण्यासाठी प्रत्येकामध्ये जणू अहमहमिकाच लागली होती.

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’च्या सेटवर तर बाळूमामाच्या घरात जाऊन येण्यासाठीसुद्धा जणू स्पर्धा लागली होती. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सेटवर गोकुळधाम सोसायटी असो, भगवान श्रीकृष्ण मंदिर असो, आत्माराम तुकाराम भिडे यांचा सखाराम असो (स्कूटर बोलायचं नाही हं गोकुळधामच्या एकमेव सेक्रेटरींना राग येतो.), डॉ. हंसराज हाथींचं घर किंवा लेखक तारक मेहता आणि अंजली मेहता यांच्या घराच्या नामफलकाबरोबर छायाचित्रे काढून घेण्यासाठी चढाओढ लागली होती. 1977 साली गोरेगावच्या विस्तीर्ण जागेवर ही चित्रनगरी उभारण्यात आली आहे आणि त्या ठिकाणी गाजलेल्या असंख्य मराठी, हिंदी चित्रपट तसेच मालिकांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. महामंडळाचे उपअभियंता चंद्रकांत कोळेकर यांनी अमरजीत मिश्रा यांच्या उपस्थितीत माहिती देताना सांगितले की, 521 एकर अशा विस्तीर्ण जागेवर सुमारे 2500 कोटी रुपये खर्चून या दादासाहेब फाळके चित्रनगरीला जागतिक दर्जाची अत्याधुनिक बनविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने यासाठी जागतिक पातळीवर खासगी भागीदारी करण्यासाठी उच्च दर्जाच्या वास्तुविशारदाचा आणि सर्वोत्तम दर्जाच्या कंत्राटदाराचा शोध सुरू केला आहे. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या करार पद्धतीने या चित्रनगरीला अत्याधुनिक बनविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येणार आहे. या अत्याधुनिकीकरणासाठी एक सर्वंकष आराखडा (मास्टर प्लॅन) तयार करण्यात आला आहे. हे काम जो करू शकेल त्या कंत्राटदार, ठेकेदाराला 50 वर्षे भागीदारी देण्यात येईल. त्यानंतर पुन्हा निविदा काढून नव्या भागीदाराचा शोध घेण्यात येईल. या घडीला जागतिक

पातळीवरचा कोणीही कंत्राटदार आलेला नाही, पण मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, अनिल अंबानी यांच्या रिलायन्स बिग एन्टरटेनमेंट आणि भानोत इन्फ्रावेन्चर या कंपन्यांनी या कामासाठी इच्छा प्रदर्शित केली आहे. यावर आता राज्य शासनाने नियुक्त केलेल्या समितीने निर्णय घ्यायचा आहे. हे आधुनिकीकरणाचे काम एकदा सुरू करण्यात आले की ते पाच वर्षांत पूर्ण करण्यात येईल. पाच वर्षांनंतर या दादासाहेब फाळके चित्रनगरीचा संपूर्ण चेहरामोहरा बदललेला आपल्याला पाहायला मिळेल. हा मास्टर प्लॅन काही वर्षांपूर्वी बनविण्यात आला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला विशेष महत्त्व दिले आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. अर्थात यासंदर्भात जी समिती बनविण्यात आली आहे त्यात महामंडळाच्या विद्यमान उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा यांचा समावेश नाही, परंतु ही समिती आधी बनविण्यात आली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समितीमध्ये अमरजीत मिश्रा यांना लोकप्रतिनिधी या नात्याने अशासकीय पदाधिकारी म्हणून स्थान द्यावे आणि निर्णय प्रक्रियेचे महत्त्वाचे अधिकार देण्यात यावेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या बरोबरीने राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेल्या या उपाध्यक्षांना सोबत घ्यावे. म्हणजे हे अत्याधुनिकीकरणाचे काम झपाट्याने पुढे वेग घेईल आणि हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होऊ शकेल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात आधुनिक स्टुडिओ, जुन्या स्टुडिओंचा पुनर्विकास, महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आधारित गावांची निर्मिती, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, बाह्य चित्रीकरणाशिवाय आधी आणि नंतरच्या चित्रीकरणासाठी आवश्यक त्या अत्याधुनिक सुविधा आणि अत्याधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्सचे स्टुडिओ बनविण्यात येणार आहेत.

पर्यटनाला वाढता वाव देताना त्यासाठी मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांसाठी वस्तुसंग्रहालय (म्युझियम) बनविण्यात येणार आहे. कन्वेन्शन सेंटर व्यतिरिक्त पंचतारांकित, त्रितारांकित आणि साधी हॉटेल तसेच डॉर्मेटरी आणि क्लब हाऊसच्या सुविधा असतील. आजमितीला 15 स्टुडिओ, आठ गावांचे लोकेशन आणि 40 बाह्य चित्रीकरण करण्यात येते, परंतु आता वाढत्या आधुनिकीकरण आणि मागणीनुसार नव्या आराखड्यात चित्रपट आणि मालिकांसाठी निर्माते दिग्दर्शक यांना अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होणार असल्याने चित्रनगरीच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल. आज राज्य सरकारला विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी सभागृह भाड्याने घ्यावी लागतात. त्यावर लाखो-कोटी रुपये खर्च होतो. या

चित्रनगरीमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त असे भव्य प्रेक्षागृह बनविण्यात आले तर सरकारचे, संबंधित खात्यांचे लाखो-कोटी रुपये वाचतील. राज्य सरकारच्या सांस्कृतिक खात्यातर्फे मराठी चित्रपट महोत्सव, नाट्य महोत्सव, विविध प्रकारच्या स्पर्धा, संमेलने या ठिकाणी घेता येऊ शकतील. इतर वेळी ही सभागृहे भाड्याने देऊन उत्पन्न वाढविण्यासाठी मदत होऊ शकेल. ज्यांच्या नावाने महाराष्ट्र सरकारने ही चित्रनगरी 1977 साली उभारली, त्या दादासाहेब फाळके यांच्याबद्दलची माहिती घेणेसुद्धा या ठिकाणी औचित्यपूर्ण ठरेल. धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके (जन्म 30 एप्रिल 1870; त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र-निधन 16 फेब्रुवारी 1944; नाशिक, महाराष्ट्र) हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिले चित्रपट निर्माते होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते. 1913 साली त्यांनी निर्मिलेला ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. 1937पर्यंतच्या आपल्या 19 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 95 चित्रपटांची व 26 लघुपटांची निर्मिती केली. त्यांच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील सर्वांत मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो. त्यांचे वडील दाजीशास्त्री प्रसिद्ध संस्कृततज्ज्ञ होते. आईचे नाव द्वारकाबाई होते.

इ. स. 1885 साली त्यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे प्रवेश घेतला. इ. स. 1890 साली जे. जे. कला महाविद्यालयातून उत्तीर्ण झाल्यावर ते कला भवन, बडोदा येथे शिल्पकला, तंत्रज्ञान, रेखाटन, चित्रकला, छायाचित्रणकला आदी गोष्टी शिकले. त्यांनी गोध्रा येथे छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला, परंतु गोध्रा येथे झालेल्या ब्युबॉनिक प्लेगच्या उद्रेकात त्यांची प्रथम पत्नी आणि मूल दगावल्यावर त्यांना ते गाव सोडावे लागले. लवकरच त्यांची ल्युमिएर बंधूंनी नेमलेल्या 40 जादूगारांपैकी एकाशी जर्मन कार्ल हर्ट्झ याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांना भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थेसाठी ड्राफ्ट्समन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या धडपड्या स्वभावामुळे लवकरच ते नोकरीच्या बंधनांना कंटाळले व त्यांनी छपाईचा व्यवसाय सुरू केला. शिळाप्रेस छपाईच्या तंत्रात ते वाकबगार होते. त्यांनी राजा रविवर्मांसोबत काम केले. पुढे त्यांनी स्वत:चा छापखाना काढला, तसेच छपाईची नवी तंत्रे आणि यंत्रे अभ्यासायला जर्मनीची वारी केली.

छपाई व्यवसायात त्यांच्या सहकार्‍यांशी त्यांचे विवाद झाले आणि फाळकेंनी छपाईच्या व्यवसायास रामराम ठोकला. पुढे लाईफ ऑफ ख्रिस्त (ङळषश ेष उहीळीीं) हा मूकपट पाहिल्यानंतर त्यांनी आपले लक्ष हलत्या चित्रांच्या (चित्रपट, एपसश्रळीह:चेींळेप झळर्लीीींशी) व्यवसायाकडे वळवले व 1912 साली त्यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला मूकपट काढला, जो 3 मे 1913 साली मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात (उेीेपरींळेप उळपशार) प्रेक्षकांसाठी पहिल्यांदा दाखवण्यात आला. महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या या सर्वोत्कृष्ट कार्यामुळे दादासाहेब फाळके चित्रनगरी निश्चितच कात टाकणार हे निश्चित. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, महामंडळाचे उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा व त्यांच्या सर्व सहकार्‍यांना मनःपूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या शिरपेचात हा एक मानाचा तुरा ठरेल हे निःसंशय!

-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ

स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर …

Leave a Reply