नागोठणे : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गाच्या नागोठणे ते वाकण या तीन किलोमीटर अंतरात पावसाळ्यात चिखलातून वाट काढत जाणार्या वाहनांना आता रस्त्यावर होणार्या धुळीला सामोरे जाऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. याबाबत संबंधित कामाच्या ठेकेदार कंपनीचे एक अधिकारी एस. एम. स्वामी यांना विचारले असता, या रस्त्यावर दररोज पाणी मारून रस्ता ओला ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करीत असून वाहनांना तसेच पादचार्यांना होणार्या त्रासाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. नागोठणे ते वाकण या मार्गाचा बहुतांशी भाग खड्डेमय झाला आहे. सध्या उन्हामुळे रस्त्यावरील माती सुकली असल्याने जाणार्या वाहनांमुळे या मातीची भुकटी होऊन ती उडत असल्याने या भागात सध्या 24 तास धुके पडले असल्याचा भास होत आहे. विशेषत: दुचाकीस्वारांना या मार्गातून प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून नियमित प्रवास करणार्या नागरिकांना कायम सर्दी तसेच खोकला या व्याधीला सामोरे जावे लागत असल्याचे एका दुचाकीस्वाराने सांगितले.
या मार्गावर दिवसातून तीन वेळा टँकरद्वारे पाणी मारण्यात येते. सध्या नागोठणे ते वडखळदरम्यान पांडापूर परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत असून, पुढील दोन ते तीन दिवसांत नागोठणे -वाकण मार्गाचे डांबरीकरण करण्यात येईल.
-एस. एम. स्वामी, अधिकारी, ठेकेदार कंपनी