पनवेल : प्रतिनिधी
रस्त्यावरील गरीब वंचित घटक नेहमीच शिक्षणापासून वंचित राहिला आहे. अशा या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मंजिरी ट्रस्ट खारघर शहरासह नवी मुंबईत कार्यरत आहे. मुलांना शाळेत प्रवेश देऊन त्यांना फावल्या वेळेत शिकवणी देण्याचे काम या ट्रस्टच्या मार्फत केले जाते. सुमुखी उमेश यांचे याकरिता मोलाचे योगदान आहे. या वर्षी मंजिरी ट्रस्टच्या मार्फत दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. विशेष म्हणजे ट्रस्टमध्ये शिकवणी घेत असलेला अविनाश गडदे याला 86 टक्के गुण मिळून तो सुधागड शाळेत प्रथम आला आहे.
या ट्रस्टमध्ये शिक्षण घेतलेले 13 विद्यार्थी विशेष गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहेत. दुसर्या क्रमांकावर शबिनाखातून माजीदूल गाडी 77.60 टक्के गुण मिळाले आहेत, तर शिवराज मडीलप्पा पुजारी या विद्यार्थ्याने 77 गुण संपादित केले आहेत. विशेष म्हणजे सुधागड हायस्कूल कोपरामध्ये प्रथम तीन क्रमांक संपादित केलेले विद्यार्थी मंजिरी ट्रस्टमधील विद्यार्थी आहेत. चौथीपासून दहावीपर्यंत या ट्रस्टमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी दिली जाते. सध्याच्या घडीला 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यी या ट्रस्टमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती ट्रस्टच्या संचालिका सुमुखी उमेश, सुमिता देब यांनी दिली. या ट्रस्टमार्फत जिल्हा परिषद खारघर शाळेत जिल्हा परिषद शिक्षकांबरोबर गणित, विज्ञान आणि इंग्रजी आदी विषय विद्यार्थ्यांना शिकविले जात आहेत.