अलिबाग : जिमाका
मौजे रासळ येथील कंपन्यांमध्ये काम करणार्या कंत्राटी कामगारांना तसेच एचओसी प्रकल्प बाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि. 15) अलिबाग येथे दिले.
रासळ येथील कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या समस्यांबाबत अलिबाग येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भाईर, प्रभारी जिल्हाधिकारी भरत शितोळे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने आदि या बैठकीला उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री चव्हाण मार्गदर्शन करीत होते.
रासळ येथील कंपन्यांमध्ये काम करणार्या कामगारांच्या असलेल्या अडीअडचणी जाणून घेऊन कंपनी व्यवस्थापनाने त्यांना योग्य त्या सुविधा देऊन त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सहकार्य करावे, असे निर्देश पालकमंत्री चव्हाण यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिले.
कंपनी व्यवस्थापनाला पुरविण्यात येणारा विद्युत पुरवठा खंडित न होता नियमित पुरवठा करण्यासाठी महावितरणला सूचित करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
त्यानंतर पालकमंत्र्यांनी एचओसी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसदर्भातील आढावा घेऊन एचओसी परिसरात असलेल्या आठ गावांचा बायोमॅट्रिक पध्दतीने सर्व्हे करावा, अशा सूचना संबंधित कंपनी व्यवस्थापनाच्या अधिकार्यांना दिल्या. बायोमॅट्रिक पध्दतीने सर्व्हे केल्यामुळे त्या परिसरात राहत असलेल्या नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होईल. एचओसीमध्ये जास्तीत जास्त स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारांची संधी उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा सूचनांही त्यांनी यावेळी संबंधित अधिकार्यांना दिल्या.
या परिरातील गावात राहत असलेल्या नागरिकांच्या अजून काही अडीअडचणी असतील तर त्या पालकमंत्री या नात्याने शासन स्तरावरुन सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे ना. चव्हाण यांनी यावेळी सांगितले. बैठकीला विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कंपनी व्यवस्थापनाचे अधिकारी तसेच प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.