दाखला हा प्रत्येकाला आयुष्यातील एक अनिवार्य असलेला शेवटच्या क्षणापर्यंत सोबत करणारा एक कागदाचा तुकडा. प्रत्येकाला तो केव्हा ना केव्हा घ्यावाच लागतो. जन्म झाल्यावर जन्माच्या दाखल्याने याची सुरुवात होते आणि मृत्यूच्या दाखल्याने शेवट असा हा दाखला ही आपल्याला एवढीशी वाटणारी गोष्ट कोणाच्या आयुष्यात फार मोठा बदल घडवू शकते याचा आपण कधी विचारही करत नाही. शासकीय योजना असो नाहीतर परदेशगमन असो प्रत्येक वेळी कसला ना कसला दाखला हवाच. त्यासाठी करावी लागणारी धावपळ, आपला रोजगार बुडवून तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर अथवा पोलीस यांच्यामागे त्यासाठी पळावेच लागते. वृध्द माणसांचे तर हाल विचारूच नका. त्यासाठी वेळ आणि पैसा खर्च होतो तो वेगळाच. अशा वेळी आपण त्यांना मदत केली, तर त्यांच्या आपण आयुष्यात कसा फार मोठा बदल घडवू शकतो हा अमरावतीच्या डॉक्टर गौरव यांचा लेख वाचनात आला आणि माझ्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहिला.
पनवेल एसटी स्टँड जवळच्या अनधिकृत झोपड्या पाडण्यात येत होत्या. त्यावेळी पत्रकार मंडळी ही बातमीसाठी तिथे फिरत होती. त्यावेळी एक महिला तिथे अस्वस्थपणे फेर्या मारीत होती. प्रत्येकाला माझी पण झोपडी जाईल का म्हणून विचारत होती. महापालिकेचे कर्मचारी आपले काम करीत होते. पोलीस बंदोबस्त मोठा असल्याने तेथील रहिवासी फारसा विरोध करीत नव्हते. 15-20 मिनिटात तिच्या 5-6 फेर्या नक्कीच झाल्या असतील.
महापालिका अधिकारी आणि पोलिसांच्या जवळ मला बोलताना तिने पाहिले आणि मी त्यांच्या पासून बाजूला होताच तिने मला विचारले, भाऊ माझी झोपडी पण पाडणार का? तुझी झोपडी कोठे आहे मला माहीत नाही मी कसे सांगणार असे म्हणताच तिने जवळच असलेली तिची झोपडी मला हाताने दाखवली. मी आज कामाला गेले नाही. माझ्या दोन लहान मुली घरात आहेत. त्यावेळी महापालिकेचे कर्मचारी रस्त्याच्या बाजूच्या झोपड्यातील सामान बाहेर काढायला सांगत होते. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर तिची झोपडी मागे असल्याने पाडण्यात येणार नाही असे सांगताच. ती घाई घाईने निघून गेली. थोड्याच वेळात ती थंड पाण्याची बाटली घेऊन आली आणि आम्हाला तिने पाणी देऊ केले. तिचा बाप 50 वर्षापूर्वी इथे राहायला आला होता. तिचा जन्मही इथेच झाला. बहिणींचे आणि तिचेही लग्न झाले. सगळे आजूबाजूलाच राहतात. त्याच दिवशी तिच्या बहिणीच्या मुलीची हळद होती. त्याचे सामान आणायला गेलेली बहीणही उद्या मुलीचे लग्न आणि आज झोपड्या पाडताहेत समजल्यावर तशीच आली होती. आपली झोपडी पाडणार नाहीत समजल्यावर हुश्श करत तिने भाऊ, तुम्ही उद्या मुलीच्या लग्नाला या म्हणून सांगितले. मी हो म्हणालो आणि निघून आलो.
चार दिवसापूर्वी तहसील कार्यालयात गेलो असताना ती रेशन कार्ड असून धान्य मिळत नाही म्हणून आली होती. मला पाहिल्यावर ती पुढे आली. तिने धान्य मिळत नसल्याचे आणि लहान मुलीचे नाव रेशन कार्डवर नोंदवायचे असल्याचे सांगितले. ज्याला गरज आहे त्याला धान्य मिळत नाही आणि आलिशान गाडीतून येणारे धान्य घेतात ही वस्तुस्थिति आहे. तिचे हातातील पेपर पहात असतानाच एक दलाल आला. साहेब, माझ्याकडे द्या तुम्हाला 4 वाजेपर्यंत करून देतो सांगू लागला. त्याची फी ऐकून मी ते पेपर घेऊन पुरवठा अधिकार्यांच्या कार्यालयात गेलो. तिची दोन्ही कामे झाली तिच्या चेहर्यावर समाधान दिसले. मुली शाळेत आहेत त्यांची आता फी भरायची आहे, पुस्तके घ्यायची त्यासाठी पैसे हवेत कामावर गेले नाही की खाडा होतो. त्यामुळे इथे फेर्या मारणं जमत नसल्याचे तिने सांगितले. तिला इ.बी.सी.चा अर्ज का करीत नाहीस विचारल्यावर त्याची मला काही माहिती नसल्याचे तिने सांगितले. मग लगेच तिचा उत्पन्नाच्या दाखल्याचा अर्ज भरून घेतला तलाठ्यांना सांगून लगेच पंचनामा करून घेतला. शुक्रवारी तिला उत्पन्नाचा दाखलाही मिळाला. त्यामुळे तिच्यावरचा शाळेच्या फीचा भार कमी होऊ शकतो. पुस्तकांचा खर्च करायलाही कोणी तरी दाता नक्कीच उभा राहील. शासनाच्या योजना गरजू लोकांपर्यंत पोहचतच नाहीत. पोहचल्यातर त्यासाठी लागणारे दाखले मिळवणे दिव्यच असते. त्यामुळे या योजनांचा फायदा पैसेवालेच घेत आहेत. मला आठवते आणीबाणी जाहीर झाली त्यावेळी धाड पडल्यावर वर्षानुवर्षे सवलत घेणार्या अनेक धनाढ्य व्यापार्यांच्या मुलांनी शाळेत फी भरायला सुरुवात केली होती. आजही आलिशान गाडीतून मुलांना घेऊन येणारा शाळेत कमी उत्पन्नाचा दाखला देऊन सवलत घेतो आणि गरीब मात्र कर्ज काढून आपल्या मुलांना शिकवण्यासाठी फी भरत असतो अशा एखाद्याला मदत केल्यास खरोखरच त्याच्या आयुष्यात त्या छोट्याशा गोष्टीमुळे फार मोठा बदल घडू शकतो, हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे.