Breaking News

अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल

मालमत्तांवर सीबीआयचा छापा

मुंबई ः प्रतिनिधी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोप प्रकरणानंतर आता मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. या प्रकरणी तपास करीत असलेल्या सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एफ आयआर दाखल केला आहे. इतकेच नाही तर शनिवारी (दि. 24) सकाळपासून अनिल देशमुख यांच्या मुंबई व नागपूर येथील निवासस्थानी धाडसत्र सुरू केले आहे. सीबीआयने केलेल्या या कारवाईमुळे महाविकास आघाडी सरकारचे धाबे दणाणले आहेत.
परिणामी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनिल देशमुख यांच्या घर व इतर मालमत्तांवर शनिवारी सकाळी सीबीआयने छापा टाकला. जवळपास साडेसहा तास अनिल देशमुख यांच्या वरळी येथील निवासस्थानाची सीबीआयच्या अधिकार्‍यांनी झाडाझडती केली. यानंतर सीबीआयची टीम सुखदा निवासस्थान येथून बाहेर पडली. 12 अधिकार्‍यांची टीम सकाळी साडेसातच्या सुमारास अनिल देशमुख यांच्या सुखदा निवासस्थानी पोहचली होती. सुखदा निवासस्थानासोबतच इतर 9 ठिकाणीही सीबीआयच्या अधिकार्‍यांनी छापेमारी सुरू केली आहे. यात काही महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
देशमुख यांच्या घर व इतर मालमत्तांवर सीबीआयने छापा टाकला. 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपाप्रकरणी ही कारवाई झाल्याचे समजते.
परमेश्वर सर्वांचाच हिशेब करतो ः चंद्रकांत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईमागे भाजप असल्याचा आरोप केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या आरोपास प्रत्युत्तर दिले आहे. आज काही सुपात आहेत, काही जात्यात आहेत. परमेश्वर सर्वांचाच हिशेब पूर्ण करतो. या जन्मी केलेले याच जन्मी भोगायचे आहे, असा बोचरा टोला त्यांनी राष्ट्रवादीला हाणला. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने शेवटी एफआयआर दाखल केलाच. मुंबई, नागपूर येथील घरासह 10 ठिकाणी छापे घालून तपासणी सुरू आहे. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सीबीआय कायदेशीर कारवाई करीत आहे. यातून जे निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई होईल, असे पाटील म्हणाले. हसन मुश्रीफ यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता कुठल्याही विषयावर भाष्य करण्याची हसन मुश्रीफांना घाई असते. हायकोर्टाच्या निर्देशांनुसार होणार्‍या सीबीआय कारवाईत भाजपचा कट कसा, असा प्रश्न त्यांनी केला.
खरा सचिन वाझे जनतेसमोर यावा ः भातखळकर
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय त्यांच्या नागपूरमधील घरावरही छापा मारण्यात आला. या कारवाईवरून भाजप नेत्यांकडून आता महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर, असा प्रश्न उपस्थित करीत खंडण्या वसूल करणारा खरा सचिन वाझे कोण हे आता उघड होईलच, असे म्हणत टीका केली आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, सीबीआयने अनिल देशमुखांवर एफआयआर दाखल केला हे अतिशय स्वागतार्ह आहे. आता या प्रकरणातील खरा सचिन वाझे कोण हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आले पाहिजे.
गडबड जरूर है; भाजपचे संजय राऊतांना प्रत्युत्तर
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांवरून राजीनामा दिला. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शनिवारी अचानक सीबीआयने देशमुख यांच्या घर आणि कार्यालयांवर छापेमारी केली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी टीका केली होती. राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गडबड जरूर है, जेव्हा 16 वर्षांनंतर अचानक रात्रीतून वाझेला घेतले जाते. जेव्हा वाझे काय लादेन आहे का? म्हणत समर्थन केले जाते. वर्षभरात फक्त बदल्या आणि कंत्राटदारांची बिले काढली जातात, असे म्हणत केशव उपाध्ये यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply