मुंबई : प्रतिनिधी
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचे वेध सर्वांनाच लागलेले असताना आयपीएलची जादू काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. मुंबईच्या संघाने यंदाच्या आयपीएल 2019च्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. तोच धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात येणार्या चेन्नईच्या संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. गुणांच्या आकडेवारीची ही गणितं सोडवली जात असतानाच अभिनेत्री प्रीती झिंटा आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यातील चर्चेने सर्वांचेच लक्ष वेधलं आहे. ज्याविषयी सोशल मीडियावर खुद्द प्रीतीनेच खुलासाही केल्याचं पाहायला मिळालं आहे.
प्लेऑफसाठी पात्र न ठरलेल्या पंजाबच्या संघाची मालकीण, प्रीती झिंटा चेन्नईच्या संघासोबत झालेल्या त्यांच्या सामन्यात खेळाडूंशी संवाद साधताना दिसली होती. याच वेळी तिने चक्क कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणार्या धोनीला धमकीही दिली. धोनीला धमकी…? प्रीतीने धोनीला एक धमकी दिली खरी, पण तिची ही धमकी कोणत्याही गंभीर स्वरूपाची नाही हेसुद्धा तितकंच खरं.
मंगळवारी खुद्द प्रीतीने माहीसोबतचं एक छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करत त्यासोबत कॅप्शन लिहिलं आणि धोनीला एक धमकीही दिल्याचं सांगितलं. ‘कॅप्टन कूलचे माझ्यासह असंख्य चाहते आहेत, पण त्याच्याप्रती असणारी ही आत्मियतेची भावना आता त्याच्या मुलीच्या कलाने जाऊ लागली आहे,’ असं तिने ट्विटमध्ये लिहीत धोनीला, सांभाळून राहा… अशी इशारावजा धमकीच दिली आहे. ‘मी तुझ्या मुलीचं अपहणही करू शकते,’ असेही तिने या ट्विटमध्ये लिहिले आहे. प्रीतीचे हे ट्विट पाहता झिवाप्रती प्रेम करण्याचा तिचा हा अंदाज धोनीच नव्हे, तर असंख्य चाहत्यांनाही भावला असणार यात शंकाच नाही. फक्त प्रीती झिंटाच नाही, तर चाहते, सेलिब्रिटीसुद्धा माही आणि साक्षीच्या लेकीचे चाहते झाले आहेत. प्रेक्षकांमध्ये बसून आपल्या बाबांना प्रोत्साहन देणं असू दे, त्यांच्यासोबत एखादी कविता म्हणणं असू दे किंवा त्यांच्या सहकार्यांसोबत खेळणं असू देत. धोनीची लेक ही बहुविध मार्गांनी सर्वांचेच लक्ष वेधत आहे, हे मात्र तितकेच खरे.