Breaking News

रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी ‘मिशन सलामती’

पनवेल : बातमीदार

रस्ता सुरक्षेबाबत युवा संस्था व एग्झोनोबल कंपनीच्या वतीने राबविण्यात येणारा ’मिशन सलामती’ हा विशेष कार्यक्रम या वर्षातदेखील राबविण्याचा निर्धार युवा संस्था आणि एग्झोनोबल कंपनीच्या प्रतिनिधींनी केला आहे. गुरुवारी खारघर येथील युवा सेंटरमध्ये पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात याबाबतची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र चव्हाण यांच्यासह एग्झोनोबल कंपनीचे सनातन हाजरा, युवा संस्थेचे कार्यकारी संचालक रोशनी नुगेहल्ली व इतर मान्यवर उपस्थित होते. खारघरमधील युवा संस्था एग्झोनोबल कंपनीच्या सहकार्याने दोन वर्षांपासून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेसंबंधी जनजागृती करण्यासाठी मिशन सलामती हा विशेष कार्यक्रम राबविला जात आहे. नवी मुंबई वाहतूक शाखेच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात युवा संस्था शाळा-कॉलेज आणि वस्ती पातळीवर जाऊन रस्ता सुरक्षेसंबंधी जनजागृती करण्यात येत आहे. वर्षभर चालणार्‍या या कार्यक्रमाचा नुकताच समारोप झाला. त्यामुळे पुढील वर्षी राबविण्यात येणार्‍या मिशन सलामती कार्यक्रमाचा आढावा गुरुवारी खारघरमधील युवा संस्थेमध्ये आयोजित कार्यक्रमात घेण्यात आला. या वेळी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रस्ते अपघातांत जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने मदत करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली, तसेच रस्ता सुरक्षा हा विषय किती महत्त्वाचा आहे आणि याबाबत जनजागृती करणे का गरजेचे आहे, याचे महत्त्व सांगितले. एग्झोनोबल कंपनीचे हाजरा यांनी सुरक्षेसंदर्भात कंपनीची भूमिका विषद केली, तर युवा संस्थेच्या कार्यकारी संचालक रोशनी नुगेहल्ली यांनी वाहतूक पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतुक करून भविष्यात वाहतूक पोलिसांसोबत अधिक प्रभावीपणे काम करण्याचा मनोदय व्यक्त केला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply