अलिबाग : प्रतिनिधी
रायगडकर सध्या विजेच्या लपंडावाने हैराण झाले आहेत. वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्यामुळे संतप्त झालेले लोक मोर्चा काढून आपली नाराजी व्यक्त करीत आहेत. अलिबाग तालुका शिवसेनेतर्फे सोमवारी (दि. 17) महावितरणच्या मुख्य कार्यालयात जाऊन अधिकार्यांना रॉकेलचा दिवा भेट देऊन महावितरणचा निषेध करण्यात आला. आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न केल्यास शिवसेना स्टाईलने जनआंदोलन केले जाईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला. अजूनही मोसमी पाऊस रायगडात स्थिरावलेला नाही. सध्या पूर्वमोसमी पावसाच्या तुरळक सरी पडत आहेत. तरीदेखील विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. अलिबाग तालुक्यातील वीजपुरवठा रोज खंडीत होत असल्याने नागरिकांमध्ये महावितरणबाबत संताप व्यक्त होत आहे. सोमवारी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, रायगड जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, विजय कवळे, माजी तालुकाप्रमुख दीपक रानवडे, तालुकाप्रमुख राजा केणी, शहरप्रमुख संदीप पालकर, संघटक सतीश पाटील, शंकर गुरव, विकास पिंपळे, अजित पाटील, सुबोध राऊत आदींनी महावितरणच्या अलिबाग येथील कार्यालयात जाऊन तेथील अधिकार्यांना रॉकेलचा दिवा भेट देऊन आपला संताप व्यक्त केला. येत्या आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर शिवसेना स्टाईलने जनआंदोलन केले जाईल, असा इशाराही या वेळी महावितरण अधिकार्यांना देण्यात आला.