कर्जत : बातमीदार
मुसळधार पावसाने शनिवारी कर्जत तालुक्याला झोडपून काढले. त्यामुळे तालुक्यातील नदी, नाल्यांना पूर आला. सखल भागात पाणीच पाणी झाले होते. नेरळजवळ असलेल्या हंबरपाडा येथील रामाबाग सोसायटीमधील बेंद्रे फार्मच्या आजूबाजूला पाणी भरल्याने तेथे पर्यटनासाठी आलेले 27 जण अडकून पडले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात स्थानिक यंत्रणांना यश आले. शनिवारी दुपारी अचानक उल्हास नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झाली. त्यामुळे दहिवली-वंजारपाडा रस्ता बंद झाला होता. हंबरपाडा येथे असलेल्या रामाबाग सोसायटीमधील बेंद्रे फार्म परिसरात पाणी भरल्याने तेथे 27 पर्यटक अडकले होते. त्यांनी मदतीसाठी पोलिसांना फोन केले. कर्जतचे पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर यांनी नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन सांगळे यांना त्या ठिकाणी पाठवून दिले. पोलिसांच्या मदतीला तेथे दहिवली ग्रामपंचायतीचे सरपंच चिंधू तरे आणि काही तरुण होते. त्यांनी बेंद्रे फार्ममध्ये घुसून त्या सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम केले. त्यांना प्रशांत झांजे, नितीन झांजे, किशोर गायकर, विशाल गायकर, अमित तरे, रोशन तरे, प्रताप नाईक, बाळा मोरगे आणि दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी या वेळी सहकार्य केले.