सभापती तेजस कांडपिळे यांची मागणी; आयुक्तांना निवेदन
पनवेल ः वार्ताहर
पनवेल महानगरपालिकेतील कामचार्यांना गणवेश परिधान करण्याची सक्ती करावी, अशी मागणी प्रभाग समिती ’ड‘चे सभापती तेजस कांडपिळे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पनवेल महानगरालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 2016 रोजी अस्तित्वात आली. त्यामध्ये पूर्वाश्रमीची नगरपरिषद हद्द व 23 ग्रामपंचायतीतील 29 महसूल गावांचा समावेश करण्यात आला. महानगर पालिकेत वेगवेगळे विभाग कार्यरत असून त्यामध्ये शिपाई, वाहन चालक, सफाई कर्मचारी यांचा समावेश असून कार्यालयात कामकाज करताना अनेक कर्मचारी गणवेश परिधान करत नाहीत, असे निदर्शनास दिसून येते. महानगर पालिकेत दररोज अनेक नागरिक व लेाकप्रतिनिधी आपल्या कामानिमित्त येत असून कोणता कर्मचारी कोणत्या पदावर कार्यरत आहे हे लक्षात येत नसून गणवेशात नसलेले कर्मचारी नागरिकांना ओळखू येत नाही. महानगरपालिकेने कर्मचार्यांना गणवेश देण्यात आलेला असून देखील कर्मचारी गणवेश परिधान करण्यास टाळाटाळ करतात.
शासनाने काढलेल्या आदेशात सरकारी कर्मचार्यांसाठी गणवेश (ड्रेस कोड) ठरवून देण्यात आला आहे. तरी महानगर पालिकेतील शिपाई, वाहन चालक व सफाई कर्मचारी यांना कार्यालयीन कामकाजात गणवेश परिधान करण्याची सक्ती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या निवेदनाची प्रत महापौर डॉ. कविता चौतमोल तसेच सभागृह नेते परेश ठाकूर यांना देण्यात आली आहे.