खासगी डॉक्टर कोरोनाबाधित
खोपोली ः प्रतिनिधी
एप्रिल महिन्यात खोपोलीतील ज्या शास्त्रीनगर भागात कोरोना रुग्ण आढळून शहर ठप्प झाले होते, त्याच शास्त्रीनगरमधील एका प्रतिष्ठित हॉस्पिटलमधील डॉक्टर कोरोनाबाधित असल्याचे शुक्रवारी संध्याकाळी स्पष्ट झाले. सदर माहिती कळताच खोपोली नगरपालिका प्रशासन पुन्हा कामाला लागले असून, सदर डॉक्टरांच्या थेट संपर्कात व या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांची माहिती घेण्याचे काम पालिका प्रशासन व आरोग्य विभागाकडून सुरू आहे.
सदर डॉक्टरांमध्ये पाच दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. त्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. त्या तपासणीचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला असून, अहवालानुसार सदर डॉक्टर कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्याकडूनही स्पष्टता देण्यात आली आहे.
काळजीची बाब म्हणजे खोपोलीतील प्रतिष्ठित हॉस्पिटलमधील हे डॉक्टर असल्याने त्यांचा मागील आठ-दहा दिवसांत किती रुग्ण व नागरिकांशी संपर्क आला याची माहिती मिळविण्यासाठी नगरपालिका व आरोग्य विभागाला मोठी मेहनत करावी लागणार आहे. एप्रिल महिन्यातील एका कोरोना रुग्णानंतर कोरोनामुक्त झालेल्या खोपोली शहरात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सद्यस्थितीत सदर हॉस्पिटल बंद ठेवण्यात आले आहे.