Breaking News

‘अनधिकृत सदनिकांची नोंदणी करणार्या दुय्यम निबंधकांवर कडक कारवाई करा’

पनवेल ः रामप्रहर वृत्त

बेकायदेशीर इमारतीमधील सदनिकांची नोंदणी करून सामान्यांची फसवणूक करणार्‍या विकासकाला मदत करणार्‍या पनवेलच्या दुय्यम निबंधकांवर कडक कारवाई करण्याची मागणी उसर्ली येथील रामचंद्र भगत यांनी सिडकोचे अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर आणि सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे.

पनवेल तालुक्यातील नैना हद्दीतील उसर्ली खुर्द ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर इमारतींचे काम सुरू आहे. शासनाने 30 मे 2018 रोजी काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे इमारत बांधकाम परवानगीशिवाय कोणतेही दस्त नोंदणी करू नयेत, असे स्पष्ट आदेश दिले असताना पनवेल दुय्यम निबंधक कार्यालयात अनधिकृत किंवा विनापरवाना बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधील सदनिकांची नोंदणी होत असल्याचे दिसून येत आहे. अशाप्रकारे नोंदणी झाल्याने ती इमारत अधिकृत आहे, असा समज होऊन अनेक गरीब आपली साठवलेली पुंजी खर्च करून आणि कर्ज घेऊन घर खरेदी करतात. सदनिकांची नोंदणी झाल्याने बँक खरेदीदाराला कर्ज देते त्यानंतर ते बांधकाम तोडण्याची नोटीस आल्यावर खरेदीदाराला आपली फसवणूक झाल्याचे समजते. तोपर्यंत गरीब माणसाच्या हातातील साठवलेली पुंजी गेलेली असते आणि डोक्यावर बँक कर्ज अशी त्याची केविलवाणी परिस्थिती झालेली असते. विकासकाशी हातमिळवणी करून अशाप्रकारे दस्त नोंदणी करण्यात येत असल्याने गरिबांची फसवणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर पनवेलच्या दुय्यम निबंधकांवर कडक कारवाई करण्याची मागणी रामचंद्र भगत यांनी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे.   

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply