पनवेल ः वार्ताहर
अस्तित्वात नसलेल्या आरपी या धातूच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करण्याच्या बहाण्याने खारघरमधील महिलेला तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांना गंडा घालणार्या टोळीतील आरोपी अनिल सहदेव साळी (49) याला अखेर आर्थिक गुन्हे शाखेने वर्सोवा भागातून अटक केली. आरोपी अनिल साळी याने व त्याच्या सहकार्यांनी आरपी धातूच्या नावाने अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी अनिल सहदेव साळी व त्याचे सहकारी अस्तित्वात नसलेल्या आरपी धातूची मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयांची किंमत असल्याचे सांगून आरपी धातूजवळ असल्यास आपोआप पैसे वाढतात. अथवा आरपी धातूमध्ये पैसे गुंतविल्यास कोट्यवधीचा नफा होतो. अशा प्रकारचे अमिष दाखवत होते. त्यानंतर समोरच्या व्यक्तीला या व्यावसायात लाखो रुपये गुंतविण्यास भाग पाडत असे. एखाद्याने आरपी धातूच्या व्यवसायात रक्कम गुंतविल्यास त्यांना प्रात्यक्षिक दाखविण्याच्या बहाण्याने निर्जन ठिकाणी नेऊन या कामामध्ये रेडिएशन वाढल्याने कामात अडचण येत असल्याचा बनाव करुन ही टोळी त्यांच्याकडून आणखी काही लाखांची रक्कम उकळून फरार होत होती.
अशाच पद्धतीने या टोळीतील अनिल साळी याने जून 2016 मध्ये खारघरमध्ये रहाणार्या सौदामिनी कुदळे (35) या इंटेरियर डिझायनरचा व्यवसाय करणार्या महिलेकडून तसेच त्यांच्या सहकार्यांकडून आरपी धातूच्या व्यवसायात रक्कम गुंतविण्याच्या बहाण्याने तब्बल 1 कोटी 20 लाख रुपये उकळले होते. मात्र नंतर या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सौदामीनी कुदळे यांनी नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या अनिल साळी, राजीव मुखर्जी व इतरांवर फसवणुकीसह अपहाराचा गु्न्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला होता.
या प्रकरणातील आरोपी अनिल साळे हा वर्सोवा येथे रहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखा युनिट-1चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमेध खोपीकर व त्यांच्या पथकाने अनिल साळी याला वर्सोवा येथून अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावल्याची माहिती सुमेध खोपीकर यांनी दिली.