Breaking News

शेतकर्यांनी कृषी कायद्यांचे स्वागत करावे

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे आवाहन

अलिबाग : प्रतिनिधी – व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांचे होणारे शोषण थांबवून शेतकर्‍यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगल्या योजना सुरू केल्या. नवीन कृषी कायदे तयार केले आहेत. या कायद्यांचे शेतकर्‍यांनी स्वागत करावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय चिटणीस व राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शेतकर्‍यांना केले.

भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती व सुशासनदिनानिमित्त अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी संवाद अभियानात पंकजा मुंडे बोलत होत्या. आमदार रवीशेठ पाटील, भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, हेमंत दांडेकर, राजेश मापारा, प्रदेश कार्यकारीणी सदस्य सतीश लेले, जिल्हा चिटणीस मिलींद पाटील, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष हेमा मानकर, मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, तालुका सरचिटणीस संतोष पाटील, कुर्डूसचे सरपंच अनंत पाटील, तालुका चिटणीस अमित पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, देशातील शेतकरी कष्ट करतोय परंतु त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. कोरोनाच्या काळातदेखील आपल्या देशातील शेतकर्‍यांनी विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यांचा माल पडून राहता कामा नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करीत आहेत. विविध योजना राबवित आहेत. या योजना लोकप्रिय होत आहेत.  परंतु विरोधक शेतकर्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकर्‍यांनी  विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडता पंतप्रधान मोदींच्या योजनांचे व नवीन कायद्यांचे स्वागत करावे. या योजनांचा लाभ घेऊन देश आत्मनिर्भर करावा.

काँग्रेसची सत्ता असताना शेतकर्‍यांसंदर्भात काही कायदे झाले. परंतु तेव्हा विरोध केला नाही. काही लोकांनी असे कायदे करण्याच्या लेखी सुचना केल्या. तेच आता नवीन कायद्यांना विरोध करत आहेत, अशी टिका पंकजा मुंडे यांनी या वेळी केली.

नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकर्‍यांचा फायदा होणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेमुळे नऊ कोटी शेतकर्‍यांच्या बँक  खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे स्वतःला शेतकर्‍यांचे नेते म्हणविणार्‍यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच हे नेते आता नवीन कृषी कायद्यांना विरोध करीत आहेत, अशी टिका भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश मापारा यांनी केले, तर सुत्रसंचलन मिलींद पाटील यांनी केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply