Breaking News

सिडको वसाहतींमध्ये यांत्रिक झाडू?

स्वयंचलित यंत्राद्वारे रस्ते चकाचक करण्याचे नियोजन

पनवेल ः बातमीदार- सिडकोने उभारलेल्या वसाहतींमधील प्रशस्त रस्त्यांची स्वच्छता स्वयंचलित यंत्राद्वारे करण्याचे पनवेल महापालिकेचे नियोजन आहे. यासाठी पालिका आयुक्तांनी नवी मुंबई, पुणे व इतर पालिकांमध्ये होणार्‍या रस्ते स्वच्छतेचा आढावा घेतला असून दोन यंत्रे घेण्याचा विचार करीत आहेत. या यंत्रांमुळे तासाला 10 किलो मीटरचा रस्ता स्वच्छ होण्यास मदत होणार असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली.

पनवेल पालिका ही स्मार्ट सिटीमध्ये पहिल्या 10 शहरांमध्ये नावाजली जावी, यासाठी पालिका प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. सिडको वसाहतींचा परिसर नियोजनबद्ध पद्धतीचा असल्याने नियोजित शहराची स्वच्छता यांत्रिक सफाईने केल्यास मजुरांवरील खर्च टाळता येईल, यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यांत्रिक झाडू चालविणारे या स्वयंचलित दोन यंत्रे खरेदी करण्यासाठी तीन कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. पनवेल पालिकेच्या स्थापनेनंतर दुसर्‍याच दिवशी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून अनेकांनी हातामध्ये झाडू घेऊन पनवेलचे रस्ते स्वच्छ करण्यास सुरुवात केली होती. तत्कालीन आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यापासून अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांनी पहिल्यांदा सामूहिक श्रमदान करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पनवेल पालिकेने स्वच्छतेबाबत मागे वळून पाहिले नाही. आयुक्त गणेश देशमुख यांनी सिडको मंडळाकडून आरोग्य व स्वच्छता विभाग हस्तांतरण करून 100 कोटी रुपयांच्या पंचवार्षिक कंत्राटाद्वारे घंटागाडीने पालिका क्षेत्रातील कचरा गोळा करणे व शहरातील रस्ते स्वच्छ करण्यावर भर दिला. याचा परिपाक म्हणून रात्रंदिवस नजरेसमोर दिसणारी कचरा समस्या तूर्तास बंद झाली आहे.

 दीड कोटी रुपये किमतीची दोन स्वयंचलित यंत्रे खरेदी करण्याचा विचार सुरू केला आहे. एका नामांकित कंपनीशी पनवेल पालिकेचा पत्रव्यवहार झाला आहे. यावर अद्याप स्थायी समितीमध्ये व सभागृहामध्ये एकमत होणे गरजेचे आहे. त्यानंतरच यावर निर्णय होईल.

आधी पार्किंग प्रश्न सोडविणे आवश्यक

नवी मुंबई पालिकेने अशाच प्रकारचा यांत्रिक झाडूचा प्रयोग केला होता. पामबिच मार्गावर ही सफाई काहीकाळ टिकली देखील, मात्र पहिल्यासारखी स्वच्छता आजमितीला होताना दिसत नाही. खारघर, कामोठे, कळंबोली व नवीन पनवेल या वसाहतींच्या रस्त्यावर दिवसा व रात्री मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जातात. त्यामुळे पहिल्यांदा पार्किंग समस्येचा अडसर यांत्रिक सफाईला होणार आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply