Friday , March 24 2023
Breaking News

अकलूजच्या गढीवर भाजपची रंगपंचमी; राष्ट्रवादी काळवंडला

मुंबई : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच ऐन होळीच्या दिवशीच राष्ट्रवादीचे बडे नेते खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केल्याने निवडणुकीच्या धामधुमीत भाजपने रंगपंचमी साजरी केली, तर राष्ट्रवादीचा रंग उडाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.

रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुंबईत शेकडो समर्थकांसह भाजपत प्रवेश केला आहे.त्यांचा योग्य तो मान राखण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.शिवाय विजयदादा मोहिते-पाटील यांचाही या प्रवेशाला होकार असल्याने त्यांचाही पाठिंबा भाजपलाच मिळणार असल्याचा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाला आता कलाटणी मिळणार आहे. विजयसिंह मोहिते-पाटील हे राष्ट्रवादीतील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जाते, पण गेल्या काही वर्षांपासून त्यांचे राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी नेतृत्वाने सुरू केल्याचा आरोप रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजपप्रवेशामुळे या मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. मतदारसंघाच्या केंद्रस्थानी असलेला मोहिते-पाटील गट भाजपत गेला असून, या मतदारसंघात भाजपची ताकद दुपटीने वाढली, तर माढ्याचा गड राखण्यासाठी राष्ट्रवादीला सर्वांना चालणारा उमेदवार द्यावा लागणार आहे. त्यावर अद्याप एकमत झालेले नाही.

भाजप उमेदवारांची घोषणा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपतर्फे गुरुवारी 182 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (वाराणसी), भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा (गांधीनगर), राजनाथसिंग (लखनौ), स्मृती इराणी (अमेठी), हेमा मालिनी (मथुरा), नितीन गडकरी (नागपूर) आदींचा समावेश आहे. याशिवाय रावसाहेब दानवे (जालना), प्रीतम मुंढे (बीड), सुजय विखे पाटील (नगर), संजयकाका पाटील (सांगली), पूनम महाजन (उत्तर मध्य मुंबई), रक्षा खडसे (रावेर), हिना गावीत (नंदुरबार), रामदास तडस (वर्धा), सुधाकर शृंगारे (लातूर), डॉ. सुभाष भामरे (धुळे), भिवंडी (कपिल पाटील), हंसराज अहिर (चंद्रपूर), संजय धोत्रे (अकोला), अशोक नेते (गडचिरोली) आदींचा समावेश आहे. अजूनही एक यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply