पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका हद्दीत 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोविड लसीकरणासाठी ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संदर्भात नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी आयुक्तांना निवेदन दिले होते. नगरसेविका वाघमारे यांनी निवेदनात म्हटले होते की, पनवेल महापालिका हद्दीतील चालु असलेल्या 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरणसाठी ऑनलाइन टोकन नंबर घ्यावे लागत आहे. ऑनलाइन सिस्टीम असल्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रा बाहेरीलही लोक येऊन लस घेतात. त्यामुळे आपल्या पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांना त्यापासून वंचित राहावे लागते, म्हणुन या लसीकरणसाठी ऑनलाइन टोकन नंबर 100 घ्यावे आणि पनवेल महापालिका हद्दीतील स्थानिक लोकांना लसीकरणसाठी ऑफलाइन टोकन नंबर 100 घेण्यात यावे, त्यामुळे लसीकरण सर्व नागरिकांना मिळेल. या मागणीची दखल घेत पनवेल महापालिका हद्दीत 18 ते 44 वयोगटातील नागरिकांची लसीकरण नोंदणी ऑफलाइन पद्धतीने सुरू झाली आहे. त्यामुळे पनवेलमधील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी केले आहे.