म्हसळा ः प्रतिनिधी – तालुक्यांत गट शिक्षण अधिकार्यांसह विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर व उपशिक्षक अशी अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे म्हसळा तालुक्यात प्राथमिक शिक्षणाचा बोजवारा वाजला आहे.
म्हसळा तालुक्यात एकूण 125 शाळा असून त्यात जि. प. प्राथमिक शाळा 102, माध्यमिक शाळा 20, तसेच खाजगी अनुदानित, विना अनुदानीत व उच्च माध्यमिक स्वयं अर्थसहाय्य अशा प्रत्येकी एक प्राथमिक शाळेचा समावेश आहे. या सर्वावर नियंत्रण ठेवणार्या गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक तसेच पदवीधर व उपशिक्षक अशा रिक्त पदांनी शंभरी गाठली आहे. तर रजेवर जाणार्यांची संख्याही नेहमी बर्यापैकी असते. ही पदे व तालुक्यातील अनेक शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाहीत.
समग्र शिक्षा अभियान, विद्यार्थी शाळेपासून वंचीत न रहाणे, समावेशीत शिक्षण, स्वयं मूल्यांकन, अध्ययन स्तर अहवाल असे अनेक उपक्रमांची शिक्षण विभागांत व्याप्ती आहे. मात्र त्याचे तपासणी मूल्यांकन, मार्गदर्शन या अभावांमुळे राबविलेले उपक्रम दर्जेदार होत नसल्याची पालकांचीही तक्रार असते.
शासनाने सर्व शिक्षा अभियानाचे एकत्रीकरण करून ‘समग्र शिक्षा’ अभियान योजनेची निर्मिती केली आहे. हे अभियान पूर्व प्राथमिक ते इयत्ता बारावीपर्यंतच्या मुलांसाठी सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व आवश्यक शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरणे आवश्यक आहे.
-दादा कांबळे, निवृत्त प्रा. शिक्षक