Breaking News

आरोग्यदूतांचा रविवारी सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त

सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून व अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्थेच्या वतीने कॅन्सर रुग्णांची सेवा करणार्‍या व इतर रुग्णसेवा देणार्‍या डॉक्टरांचा सत्कार सोहळा रविवारी (दि. 7) खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

1 जुलै हा दिवस सर्व भारतात राष्ट्रीय डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो. देव कोणी पाहिला नाही, पण त्याचे अस्तित्व हे या भूतलावर याच डॉक्टरांच्या रूपात जाणवते. डॉक्टर रुग्णसेवेद्वारे मानवसेवा करून समाजासाठी आपले जीवन व्यतित करीत असतात. यासाठी त्यांचा सन्मान करून धन्यवाद देण्यासाठी 1 जुलै रोजी डॉक्टर्स डे साजरा केला जातो. यानिमित्ताने अनेक सामाजिक व आरोग्यविषयक काम करणार्‍या संस्था या डॉक्टरांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करीत असतात.

सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून व अध्यक्षतेखाली 3 फेब्रुवारी 2019 रोजी धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्था स्थापन करण्यात आली. पनवेल परिसरासह रायगड जिल्ह्यातील कॅन्सरग्रस्त रुग्णांची हरप्रकारे मदत करण्याच्या ध्येयाने ही संस्था कार्यरत आहे. त्या अनुषंगाने कॅन्सर रुग्णांची सेवा करणार्‍या व इतर रुग्णसेवा देणार्‍या डॉक्टरांचा सत्कार रविवारी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या वेळी कर्करोगाबाबतची माहिती आणि मार्गदर्शन प्रथितयश तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात येणार आहे.  त्याचबरोबर अ‍ॅक्टट्रॅक्टचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, डॉ नवीन खत्री, डॉ. गिरीश गुणे, डॉ. अतुल बुडुक, डॉ. नीलेश बांठिया, डॉ. शुभदा नील, डॉ. निशांत काठाले यांचा सत्कार केला जाणार आहे, तर ते मार्गदर्शन करतील. या सोहळ्यात कलादर्पण आणि सीकेटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची व्यसनमुक्तीविषयी प्रबोधनात्मक नाटिका सादर करण्यात येणार आहे.

या सोहळ्यास नागरिक, डॉक्टर्स, सामाजिक आणि शैक्षणिक संस्था, आरोग्यविषयक कार्य करणार्‍या संस्था, कॅन्सरबाबत सेवा देणार्‍या संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply