पनवेल महापालिकेकडून कारवाईचा बडगा; प्लास्टिकचा वापर
पनवेल ः बातमीदार
प्लास्टिकमुक्त महापालिका म्हणून राज्यातील पहिली महापालिका असलेल्या पनवेल महापालिकेत प्लास्टिकमुक्तीसाठी अजूनही प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांकडून प्लास्टिक न वापरण्याची अपेक्षा करणार्या पनवेल महापालिकेचे मुख्यालय प्लास्टिकमुक्त करण्याची मोहीम नुकतीच राबविण्यात आली. या मोहिमेत महापालिकेच्या 10 वेगवेगळ्या कर्मचारी, विभागांमध्ये प्लास्टिक वापराबाबत शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. पनवेल महापालिकेत स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्लास्टिकविरोधी मोहीम जोरदार राबविली जात आहे. आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत कधी कारवाई, तर कधी प्रबोधनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. पनवेल महापालिकेत ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या वरिष्ठ सल्लागार मधुप्रिया आवटे यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालय प्लास्टिकमुक्त करण्यासाठी मोहीम राबविली होती. महापालिकेत विशेष परिपत्रक काढून प्रत्येक विभागात कर्मचार्याने महापालिकेत कोणत्याही वापरासाठी प्लास्टिक आणू नये, असा आदेश काढला होता. विभागात काही प्लास्टिक असेल, तर 15 ऑक्टोबरपर्यंत हे प्लास्टिक काढून टाकण्याचे ठरले होते. कर्मचार्यांना 15 ऑक्टोबरपासून प्लास्टिक वापरू नये, असा आदेश दिल्यामुळे आरोग्य विभागाने महापालिकेत प्लास्टिकविरोधी मोहीम राबविली. स्वच्छ भारत अभियानाच्या वरिष्ठ सल्लागार मधुप्रिया आवटे यांनी महापालिकेत प्रत्येक विभागात जाऊन पाहणी केली. या मोहिमेत मिनरल वॉटरचा पुन्हा पाणी भरून उपयोग केल्यासही दंड आकारण्यात येईल, अशी सूचना दिली होती, तसेच जेवणाचे डबे, थर्माकोल, साहित्य ठेवण्यासाठी प्लास्टिकची वेष्ठणे कार्यालयात न ठेवण्यास सक्ती केली होती. 400हून अधिक कर्मचार्यांनी या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला, मात्र तरीदेखील प्लास्टिकची सवय लागलेल्या कर्मचार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये भांडार, लेखा, चालक कक्ष, नगरसचिव कार्यालय, वैद्यकीय अधीक्षक, पर्यावरण आदी विभागात 10 जणांवर कारवाई करण्यात आली. शिस्तभंगाची कारवाई म्हणून प्रत्येकाकडून 150 रुपयांचा दंड आकारण्यात आला. महापालिका क्षेत्रात आपण कारवाई करतो, तर मग आपले घर स्वच्छ का करू नये, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे स्वच्छ भारत अभियानाच्या वरिष्ठ सल्लागार मधुप्रिया आवटे यांनी सांगितले.