Breaking News

‘तरणखोप ग्रा.पं.मधील भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी’

पेण : प्रतिनिधी

तालुक्यातील तरणखोप ग्रामपंचायत हद्दीतील गोविर्ले गावामध्ये  2016-2017 या कालावधीत न केलेल्या कामांचे बिल अदा करून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जिल्हा नियोजन समिती सदस्य जगदिश ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तरणखोप ग्रामपंचायतीच्या वतीने गोविर्ले गावात किती विकासकामे करण्यात आली तसेच इतर कामांबाबत जगदिश ठाकूर यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. या माहितीत 2016-17 या काळात गोविर्ले गावात दोन रस्त्यांचे काम करण्यात येऊन त्यांची बिले अदा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र गोविर्ले गावात या कालावधीत कोणतीही कामे झाली नसल्याने जगदिश ठाकूर यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज करून संबंधित ग्रामसेवक व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच या कामातील ठेकेदार आता उपसरपंच असून, त्यांना त्यावेळी ग्रामसेवकाने ठेकेदार नसल्याचा दाखला दिला आहे. त्यामुळे संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करावी. तसेच सदस्य म्हणून निवडून आलेले व उपसरपंच म्हणून कार्यरत असणारे आदित्य पाटील यांची चौकशी करून त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी केली असल्याचे जगदीश ठाकूर यांनी या वेळी सांगितले. तरणखोप ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत लेखा परिक्षकांनीही अनेक ताशेरे मारले आहेत. 1000 रूपयांच्या वरील खर्चास, पंचायत समितीसह अभियंता, उपअभियंता यांच्याकडून मुल्यांकन मंजूर करून खर्च करणे आवश्यक असल्याचा शेरा लेखा परिक्षकांनी मारला आहे, असे असताना तत्कालीन ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत फंडातून ठेकेदाराला न केलेल्या कामापोटी बिल अदा केले होते.त्यानंतर पेणच्या गटविकास अधिकार्‍यांकडूनही त्याच न केलेल्या कामाचे बिल अदा करण्यात आल्याचे दिसून आले. याबाबत गटविकास अधिकार्‍यांना विचारणा केली असता तत्कालीन ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत फंडातून बिल दिले. त्यानंतर आलेल्या ग्रामसेवकाने पंचायत समितीकडून बिल अदा केल्याचे सांगितले. याबाबत संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी वासुदेव पाटील, गणेश पाटील, धर्माजी ठाकूर, ग्रा.पं. सदस्य दिपक ठाकूर, मनोहर ठाकूर, दामाजी ठाकूर, दिनकर ठाकूर उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply