चार महिन्याचा सुखी संसार. जीवनसाथी बरोबर हसतखेळत कधी रडतखडत ऊन-पावसाळा झेलत संसाररूपी वटवृक्ष फुलवण्याचे क्षण. आनंदाची पाखरण करीत रथाची दोन्ही चाके बनून राधेलाल पटेल याने आपल्या अर्धांगीबरोबर नुकतेच संसाररूपी महासागरात प्रस्थान केलेले, तर आपल्या मुलीचा संसार उभा राहावा यासाठी राधेलालचे सासू-सासरे त्यांना मदत करण्यासाठी छत्तिसगढ राज्यातून पुणे शहरासारख्या महानगरात काबाडकष्ट करत होते. असा संसार उभा करणार्या राधेलालला उद्याचा दिवस काय उजाडेल याची पुसटशीही कल्पना नव्हती. रात्री झोपताना आपल्या पत्नीसह आपण चिरनिद्रा घेणार आहोत, याची जाणीव नसताना ते सर्व शांत झोपले आणि घडले ते अघटीत…
बांधकाम मजूर म्हणून काम करणार्या राधेलाल रामनरेश पटेल 25 त्याची पत्नी ममता रा. पटेल 22 वडील जेतुलाल 50, आई प्रदेशानीन जेतुलाल 45 अशा चार जणांचा संरक्षण भिंत पत्र्याच्या झोपडीवर पडून अंत झाला. प्रथमच पुण्यात आलेल्या या बांधकाम मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आंबेगाव मध्ये घडली. यात एकून 6 मजुरांना आपले प्राण गमवावे लागले. कोंढवा पुणे परिसरातील अल्कोन स्टायलस लँडमार्क सोसायटीजवळ कांचन ग्रुपच्या वॉल कंपाऊंडला लागून लेबर कॅम्पसाठी रॉयल एक्झीटर कन्स्ट्रक्शन या ग्रुपने पत्र्याचे शेड उभारून मजुरांच्या राहण्याची सोय केली होती.
रात्री पावणेदोनच्या सुमारास वॉल कंपाऊंड कोसळून मजुरांच्या झोपड्यांवर पडले. या अपघातात एकूण 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जखमी मृतांमध्ये दोन महिला व 4 लहान मुलांचा समावेश आहे. अलोक शर्मा 28, मोहन शर्मा 20, दीपारंजन शर्मा 30, रवी शर्मा 20, लक्ष्मीकांत सहानी 33, अवदेश सिंग 34, सुनील सिंग 35, भीमा सिंग 28, संगीतादेवी सिंग 26, निवा देवी 30, ओवी दास 2, सोनाली दास 6, अजितकुमार सिंग 7, रावलाकुमार सिंग 7 अशा बालकांचा समावेश असून अजयकुमार शर्मा 19 व पूजा शर्मा 24 हे जखमी झाले आहेत. घटनेस जबाबदार असणार्या 14 जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑल्कोन स्टांलस संस्थेचे भागीदार बिल्डर जगदीश प्रसाद तिलकचंद अगरवाल 64, सचिव जगदीशचंद्र अगरवाल 34, राजेश ज. अगरवाल 27, विवेक सुनील अगरवाल 21, विपुल सुनील अगरवाल 20, व कांचन संस्थेचे पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मीकांत गांधी यांच्यासह साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर, लेबर ठेकेदार यांचा समावेश आहे. या घटनांचा विचार केला असता, मजूर काम करणार्या इसमांची कामगार विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे, मात्र बांधकाम व्यावसायिक या कायदेशीर बाबींना बगल देत असून आर्थिक भुर्दंड नको यासाठी कायद्याला पळवाट देत आहेत. कामगार कायदे तसेच नाका कामगार या कायद्यांचे पालन होत नसल्याने मजुरांना विमा व नुकसानभरपाई देण्यास शासनाला अडचण निर्माण होत असते.
कामगार विभाग व बिल्डर यांच्या साटेलोटे धोरणात बिचारा मजूर कामगार देशोधडीला लागत आहे. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत राष्ट्रीय आपत्कालीन मदत निधीतून जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
अशीच घटना मुंबईतील मालाड पूर्व भागात पिंपरी पाडा येथील झोपडपट्टीवर संरक्षण भिंत कोसळून 19 जणांचा मृत्यू व 60 जखमी झाले होते, तर कल्याणमध्ये परींळेपरश्र उर्दू शाळेची भिंत कोसळून शोभा कांबळे 60 वर्ष करीना मोहम्मद चंदन 25, मोहम्मद चंद्र 3 अशा तीन जणांचा मृत्यू झाला असून आरती राजू कर्डिले 16 ही तरुणी जखमी झाली आहे. या सर्वांना कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पावसाळ्यातील भिंत कोसळून अपघात होण्याचे प्रमाण पाहता शासनाने याची गंभीर दखल घेत निकृष्ट बांधकाम व दुसर्याच्या जीवितास धोका निर्माण होईल असे बांधकाम सुरू असल्यास मग ते खाजगी असो वा शासकीय अशांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. याच दरम्यान निळकंठ बिल्डर्स सिद्धार्थनगर खोपोली या महाकाय इमारत विकसकाने बांधलेली संरक्षण भिंत कोसळून ती पाताळगंगा नदीशेजारी असणार्या धोबी घाटावर कोसळली. 50 फूट लांबीची व 20 फूट रुंदीची ही भिंत दुपारच्या वेळेस धोबी घाटावर पडल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या ठिकाणी कपडे धुण्यास कोणीही महिला व पुरुष नसल्याने मोठा अपघात टळला. नाहीतर खोपोलीमध्ये अशाच प्रकारचा आघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या भिंतीबाबत खोपोली येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. खोपोली पोलीस स्टेशन व नगरपालिका प्रशासन, तसेच लोकप्रतिनिधी यांना लेखी तक्रारी करूनही कोणतीच कारवाई न झाल्याने परिसरातील रहिवाशांत चिंतेचे वातावरण असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सिद्धार्थनगरच्या रहिवाशांनी केली आहे.
इकडे चिपळुणात मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास 20 वर्षांपूर्वी बांधलेले तिवरे धरण पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे फुटून 13 घरांची लोकवस्ती असलेल्या भेंदवाडीतील 9 घरे वाहून गेली. 24 जण बेपत्ता झाले. गावकरी जेवण करीत असताना धरण फुटल्याची बोंब झाली, मात्र काहीच हालचाल करता न आल्याने गावकरी पाळापाचोळ्याप्रमाणे प्रवाहात बेपत्ता झाले. आत्माराम चव्हाण 75, चंद्रभागा कृष्णा चव्हाण 70, पांडुरंग चव्हाण 55, नंदा चव्हाण 50, दशरथ चव्हाण 20, संदेश विश्वास खांडवे 21, वैष्णवी रवींद्र चव्हाण 22, शारदा बळीराम चव्हाण 53, अनसूया चव्हाण 45, दुर्वा चव्हाण दीड वर्षे हे वाहून गेले. 3 जुलै रोजी घडलेल्या घटनेने जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरून गेला. बचाव कार्यास एनडीआरएफचे पथक दाखल झाले. बचाव कार्य सुरू झाले. 20 मृतदेह हाती आले असले तरी अद्याप वाहून गेलेल्या 4 जणांचा तापास लागला नसल्याने जोपर्यंत बेपत्ता झालेले सापडत नाहीत तोपर्यंत शोधकार्य सुरू राहील, असे एनडीआरएफ टीमचे म्हणणे आहे. या टीमने तब्बल 30 किमी अंतर पिंजून काढले आहे. पाणी हे जीवन आणि जीवन कोणाला तारते तर कोणाला मारते. चार दिवसापूर्वी महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्यासाठी राज्यातील नागरिक कासावीस झाले होते.
दुष्काळाची चिन्हे दिसत होती आणि मान्सूनचे आगमन होताच मुंबईसह पुणे, नाशिक, औरंगाबाद, मराठवाड्यासह विदर्भातही हाहाकार उडाला. धरणात पाण्याची पातळी वाढवून पिण्याच्या पाण्याचे संकट दूर झाले आहे, मात्र हेच पाणी काही जणांच्या जीवावर उठून पूर्ण आयुष्य बरबाद केले आहे. काही जणांचे कुटुंब भिंतीखाली गाडले गेले. पोटापाण्याच्या उद्योगासाठी आलेले मोलमजुरी करणारे साखरझोपेत चिरनिद्रेत गेले. चिपळुणातील भेंदेवाडीतील ग्रामस्थांना जेवणाच्या ताटावरून पाण्याने आपल्यात सामावून घेतले. पाणी जीवन आहे की मरण अशी चर्चा करावी लागत आहे, मात्र याला जबाबदार निसर्ग नसून मानवाच्या चुकांमुळे या घटना घडल्याचे सिद्ध होत आहे. पुण्यातील भिंत असो कल्याणमधील शाळेची भिंत, तसेच मुंबईच्या मालाड पूर्व पिंपरीपाडा येथील बांधकाम झालेल्या रस्त्याची भिंत असो. या घटना मानवी चुका व निष्काळजीपणा, तसेच स्वार्थापोटी काही कमावण्याच्या नादात घडल्या असल्याचे चित्र आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम मानवाच्या जीवावर बेतत असून अघटीत घटनांना पावसाच्या पाण्याकडे बोट दाखवले जात आहे, मात्र यातील दोषी चिरीमिरी घेणारे अधिकारीच असल्याने अशा अधिकार्यांना कठोर कारवाईच्या पिंजर्यात उभे करणे हेच कर्तव्य समजले पाहिजे.
-अरूण नलावडे, फिरस्ती