

महाराष्ट्र विधानसभेच्या मुंबई येथील विधानभवनात झालेल्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. ही केवळ या अधिवेशनाची सांगता नव्हती, तर हा दिवस होता तेराव्या महाराष्ट्र विधानसभेचा अखेरचा दिवस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तेराव्या विधानसभेत बोलताना केलेल्या भाषणामुळे मला आठवण झाली ती 2016 साली त्यांनीच मला वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत शासकीय निवासस्थानी दिलेल्या मुलाखतीची. 31 ऑक्टोबर 2014 रोजी मुंबईच्या शेषराव वानखेडे क्रीडा प्रेक्षागृहात देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून लाखोंच्या संख्येने उपस्थित झालेल्या जनसागरासमोर शपथ घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी ही शपथ घेतली होती. साधारणपणे मंत्रिमंडळाचा शपथविधी हा राजभवन येथे होत असतो, पण 1995 साली महाराष्ट्राच्या दुसर्या बिगर काँग्रेसी सरकारचा म्हणजे शिवशाही सरकारचा शपथविधी समारंभ दादरच्या शिवतीर्थावर झाला होता. डॉ. मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या शिवसेना-भाजप युती सरकारचा हा शपथविधी सोहळा अरबी समुद्राशी स्पर्धा करणार्या जनसागराच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा झाला होता. त्यानंतर 15 वर्षांनी भारतीय जनता पक्षाच्या अल्पमतातल्या सरकारचा हा अभूतपूर्व शपथविधी सोहळा वानखेडे क्रीडाप्रेक्षागृहात (स्टेडियमवर) झाला. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत आपले युतीचे भक्कम सरकार 5 डिसेंबर 2014 रोजी पूर्णत्वास आणत अल्पमतातल्या सरकारला स्पष्ट बहुमतात आणले.
देवेंद्रांच्या या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली, तेव्हा त्यांनी पत्रकारांना ‘वर्षा’ या आपल्या निवासस्थानी मुलाखती दिल्या होत्या. या मुलाखतीत त्यांनी 2019 पर्यंतच काय तर 2019 नंतरसुद्धा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच असेन असे आत्मविश्वासाने सांगितले होते. या त्यांच्या बोलण्यात कोणतीही घमेंड नव्हती किंवा फाजील आत्मविश्वास नव्हता, तर तो एक जबरदस्त पण तितकाच विनम्रपणे व्यक्त केलेला स्वतःबद्दलचा आणि आपल्या सरकारच्या कार्यकर्तृत्वाबद्दलचा सार्थ अभिमान होता. याचीच आठवण तेराव्या विधानसभेच्या अखेरच्या दिवशी केलेल्या आपल्या भाषणात दिसून येत होती. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षासमोर एका जबरदस्त आत्मविश्वासाने केलेल्या आपल्या समारोपाच्या भाषणात सांगितले की,
मी पुन्हा येईन… याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी… मी पुन्हा येईन…
गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी
नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी… मी पुन्हा येईन…
माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनविण्यासाठी माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी… मी पुन्हा येईन…
याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची साथ घेत, त्याचा हात हाती घेत माझ्या महाराष्ट्राला
एक नवं रूप देण्यासाठी नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी… मी पुन्हा येईन…
तेराव्या विधानसभेचा हा शेवटचा दिवस सुद्धा तसं पाहता ऐतिहासिक असाच म्हणावा लागेल. महाराष्ट्राच्या गेल्या 40 वर्षात तिसर्यांदा मुंबई पाण्यात बुडून निघाली होती. 1974 साली मुंबईत 275 मि.मी. इतका पाऊस पडला होता. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत अतिवृष्टी होऊन मुंबईत हाहाकार उडाला होता. आता जुलै 2019 च्या प्रारंभी आजवरचे सारे विक्रम मोडीत 400 मि.मी. हून जास्त पडलेल्या पावसाने कहर केला होता. मालाड येथे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सुमारे 25 जणांचा बळी घेतला आणि शंभरेक जण जखमी झाले. कल्याण, नाशिक आणि पुण्यातसुद्धा पावसाने थैमान घातले आणि अनेक निष्पापांना यमसदनी धाडले. तेराव्या विधानसभेचा तो शेवटचा दिवस होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकाळी आधी मालाडला धावले. दुर्घटनेची माहिती घेतली. नगरविकास राज्यमंत्री योगेशभाई सागर यांना सोबत घेऊन कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाह्य रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. तिथून ते तडक मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात पोहोचले. मुंबईतील धुवांधार पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीचा आढावा घेतला. नियंत्रण कक्षातून माहिती घेऊन, तसेच आवश्यक त्या सूचना देऊन मुख्यमंत्री विधानभवनात दाखल झाले. पावसाळी अधिवेशनाचा पर्यायाने तेराव्या विधानसभेचा शेवटचा दिवस असल्याने विरोधी पक्षांनी मुंबईसह राज्यातील अतिवृष्टी आणि त्यामुळे उद्भवलेल्या भीषण परिस्थितीत सरकारवर टीकेची झोड उठविणे ओघानेच आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता. सरकारने कितीही चांगले काम केले तरी ते कसे चुकीचे आहे, हे सांगण्याची भूमिका विरोधी पक्षांनी घेतली पाहिजे, असे भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते प्रेमकुमार शर्मा मला 1990 साली म्हणाले होते. प्रेमकुमार शर्मा यांची ही भूमिका अजित पवार आणि धनंजय मुंडे हे तंतोतंत पाळताना दिसतात, पण एक गोष्ट चांगली झाली की अजित पवार यांच्या स्थगन प्रस्तावामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईसह राज्यभरात जो तुफानी पाऊस पडला आणि त्यामुळे जी अतोनात जीवित व वित्तहानी झाली त्याची आणि त्यावर सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती सभागृहात व त्या माध्यमातून राज्यातील सुमारे 12 कोटी जनतेला देणे शक्य झाले. मुख्यमंत्र्यांनी याच दिवशी आपल्या पाच वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीतील घटनांचा आढावा घेतानाच महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विविध मंत्र्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव केला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या कामगिरीचाही मुख्यमंत्र्यांनी गौरव केला. विरोधी पक्षांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानतानाच, मी पुन्हा येईन! असे ठासून सांगितले आणि तेसुद्धा कशासाठी हेही स्पष्ट करताना विरोधी पक्षांनी आपली विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी यापुढेही पार पाडावी, अशा सदिच्छा दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द नागपूरच्या महापौर पदापासून सुरू झाली आणि त्यांचा आमदार म्हणून विधिमंडळातला प्रवास थोडा असला, तरी डॉ. मनोहर जोशी यांच्याप्रमाणेच तेही थेट मुख्यमंत्री झाले. तरीही त्यांचे नेतृत्व, कर्तृत्व, कर्तबगारी याकडे लक्ष देता त्यांनी भल्या भल्या राजकीय चाणक्यांना कोसोमैल मागे टाकले असल्याचे दिसून येईल. 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत देवेंद्र फडणवीस यांना सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा विविध आघाड्यांवर अनेक प्रश्न, समस्या, अडीअडचणी यांना तोंड द्यावे लागले. सत्तेत सहभागी असलेल्या मित्रपक्षांना त्यांच्या कलाने घेऊन तारेवरची कसरत करावी लागली. डॉ. मनोहर जोशी यांनी 1995 ते 1999 या आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, स्मिता ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, भारतीय जनता पक्ष, त्यांचे आमदार, 45 अपक्ष आमदार यांना सांभाळून घेत तारेवरची कसरत केली आणि आपली कारकीर्द यशस्वी केली. त्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांनीही अल्पमतातल्या सरकारला बहुमतात आणून मित्रपक्ष आणि स्वपक्षीय यांच्या राजकीय शह-काटशह यांना योग्य त्या पद्धतीने, आपल्या बुद्धिचातुर्याने हाताळले आणि कारकिर्दीला सुवर्ण झळाळी दिली. तेराव्या विधानसभेच्या अखेरच्या अधिवेशनात शिवसेना उपनेत्या डॉ. निलमताई गोर्हे यांना विधान परिषद उपसभापती पदावर विराजमान करून शिवसेनेला आपला मित्रपक्ष म्हणून आणखी मानाचे पान आणि स्थान दिले. राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिमंडळात सामावून घेताना विजय वडेट्टीवार यांच्या शिरावर विरोधी पक्षनेते पदाचा काटेरी मुकूट ठेवला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजकीय खेळी खेळताना त्यांना मंत्रिमंडळात घेऊन आपलेसे केले. शिवसेना उपनेते तानाजी सावंत यांनाही मंत्रिपदी बसविले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस अविनाश महातेकर यांनाही मंत्रिमंडळात समाविष्ट करून आंबेडकरी जनतेला सुद्धा आम्ही आपलेच आहोत, हे दाखवून दिले. ऑक्टोबर 2016 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मध्येही मीच मुख्यमंत्री होणार हे ठासून सांगितले होते तेच पुन्हा विधानसभेच्या सभागृहात, मी पुन्हा येईन हे अधोरेखित केले. आपल्या कार्यक्षमतेवर त्यांना पूर्ण भरवसा असल्यामुळेच ते खात्रीपूर्वक सांगू शकले. देशाची आणि राज्याची विद्यमान राजकीय परिस्थिती लक्षात घेता देवेंद्र फडणवीस हे पुन्हा भारतीय जनता पक्ष, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महादेव जानकर यांची राष्ट्रीय समाज पार्टी, विनायक मेटे यांचा शिवसंग्राम आणि सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना या पक्षांच्या महायुतीला 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्तेवर येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. यासाठी देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, रामदास आठवले आदी महायुतीच्या नेत्यांनी सहकार्य, समन्वय, सामंजस्य, सौहार्द, सहनशीलता दाखवीत ‘वाचाळवीर’ बोलबच्चन नेत्यांना कात्रजचा घाट दाखवावा. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सूत्र डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करीत सत्ता पुनर्स्थापित करावी. वादाचे मुद्दे बाजूला ठेवून एकमताने, सहमतीचे मुद्दे घेऊन काम करावे, निवडणुकीची रणनीती आखावी. निवडणुकीत विजयश्री आपल्या गळ्यात सत्तेची वरमाला निश्चित घातल्याशिवाय राहणार नाही. याच पद्धतीने राज्यातील 12 कोटी जनतेला ‘अच्छे दिन’ निश्चितच येतील. महायुतीच्या नेतृत्वाखालील तमाम नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
॥यशस्वी भव॥
-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर