Breaking News

रोह्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; नागरिकांची वाहनांसह गर्दी

रोहे : प्रतिनिधी

रोहा बाजारपेठेत सोमवारी (दि. 4) अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात दिसून आले. यातील बहुसंख्य लोक दुचाकी व चारचाकी गाड्या घेऊन बाजारात आल्याने गाड्यांची रेलचेल दिसून आले. परिणामी सोशल डिस्टन्सिंचा फज्जा उडाला.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी लॉकडाऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाऊन शिथिल केल्याने सोमवारी रोह्यात नागरिकांची मोठी गर्दी पहावयास मिळाली. सर्व दुकाने उघडी झाल्याने साहित्य खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची सर्रास पायमल्ली झाली. दुचाकी, चारचाकी वाहनांचीही वर्दळ होती.

‘लॉकडाऊनची नियमानुसार अंमलबजावणी’

रोहे : कोरोना संकटाच्या काळात नागरिकांनी दाखविलेला संयम कौतुकास्पद आहे, पण आता यापुढे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. बाहेरुन येणारे लोक पाहाता त्यानुसार नियोजन करण्याची गरज आहे. या लॉकडाऊन काळात आत्यवश्यक सेवा सुरू राहतील, परंतु सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहेच. त्यासोबतच अन्य दुकानेही शासनाच्या परवानगीप्रमाणे सुरू राहतील. यापुढे शासनाच्या मार्गदर्शनानुसार लॉकडाऊन काळात नियमांची अंमलबजावणी करण्यात येईल, असे रोहा उपविभागीय अधिकारी यशवंतराव माने यांनी स्पष्ट केले. ते बैठकीत बोलत होते.

रोह्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात लोकप्रतिनिधी, व्यापारी, पत्रकार यांच्यासमवेत प्रशासनाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. पुढील काळातील शहराच्या नियोजनाबाबत उपविभागीय अधिकारी माने यांनी या वेळी माहिती दिली. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील व्यवसाय पूर्वीप्रमाणे चालू असतील, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीला नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, उपनगराध्यक्ष समीर सकपाळ, नगरसेवक, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. बाजारपेठेत बाहेरून येणारे लोक, वाईनशॉपच्या गर्दीचे नियोजन, बांधकाम व्यावसायिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत बैठकीत चर्चा झाली. काही व्यापारी चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तू विकत असल्याचे या वेळी लोकप्रतिनिधींनी सांगितले. त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले तसेच प्रत्येक किराणा दुकानदाराने दरपत्रक आपल्या दुकानासमोर लावले पाहिजे, असे सूचित करण्याचेही सांगण्यात आले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply