Breaking News

उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी डॉक्टर मानधनाच्या प्रतीक्षेत

माणगाव ः प्रतिनिधी

माणगाव उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने विशेष तज्ज्ञ पदावर काम करणार्‍या पाच डॉक्टरांना 2019-20मध्ये माहे ऑगस्ट 19पासून अद्यापपर्यंत सहा महिन्यांचे कामाचे मानधन संबंधित कार्यालयाकडून अनुदान प्राप्त न झाल्यामुळे मिळाले नसल्याने या सर्व डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. माणगाव उपजिल्हा रुग्णालय हे दक्षिण रायगडमधील मोठे व मध्यवर्ती ठिकाणी असलेले 100 खाटांचे रुग्णालय आहे. या ठिकाणी दक्षिण रायगडबरोबरच काही वेळा रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्ण औषधोपचारासाठी येतात. त्याचप्रमाणे मुंबई-गोवा महामार्गावर घडणार्‍या अपघातातील अपघातग्रस्त रुग्णांना येथे औषधोपचारासाठी दाखल केले जाते. या रुग्णालयात मध्यंतरी डॉक्टरांना मारहाणीचा प्रकार घडला होता. शिवाय येथे डॉक्टरांना राहण्यासाठी निवासस्थाने सरकारने बांधून दिलेली नाहीत. त्यामुळे माणगाव म्हटले की या ठिकाणी कोणीच डॉक्टर यायला तयार नसतात. त्यामुळे येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली. जनरल सर्जन म्हणून डॉ. संतोष कामेरकर, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.जगदिश पटेल, भूलतज्ज्ञ डॉ. भीमराव सावंत, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.सिद्धी कामेरकर, डॉ. श्रुती निकम या पाच डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली. या सर्वांची माहे ऑगस्ट 2019 ते जानेवारी 2020 असे सहा महिन्यांचे 39 लाख 67 हजार रुपये इतकी मानधनाची रक्कम देणे बाकी आहे. याकरिता या सर्व डॉक्टरांनी मध्यंतरी आ. अनिकेत तटकरे यांची भेट देऊन त्यांना निवेदन देत आमचा मानधनाचा तिढा सोडवण्यासाठी आरोग्यमंत्र्यांकडे शिफारस करावी, अशी विनंती केली आहे. या कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेल्या विशेष तज्ज्ञ डॉक्टरांपैकी बहुतांशी डॉक्टर्स हे माणगावमधील स्थायिक आहेत. त्यामुळे हे डॉक्टर कोणत्याही प्रसंगाला तातडीने उपलब्ध होतात. अशा डॉक्टरांच्या मानधनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply