Breaking News

‘रन’संग्राम निर्णायक टप्प्यावर

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चित्र एव्हाना स्पष्ट झाले आहे. यजमान इंग्लंडसह ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलचा थरार रंगणार आहे. कोणताही उलटफेर न होता अपेक्षेप्रमाणे चार अव्वल संघ निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचल्याने चुरस वाढली आहे.

एकीकडे पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागलेला वैष्णवांचा मेळा पंढरपूरकडे कूच करीत असताना, तिकडे क्रिकेटची पंढरी मानल्या जाणार्‍या लॉर्ड्सच्या मैदानावर विश्वचषक उंचाविण्यासाठी इंग्लंडमध्ये कुंभमेळा भरला आहे. हल्ली सर्रास विविध खेळांच्या स्पर्धा, मालिका, लीग होत असतात, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी)वतीने आयोजित करण्यात येणारी वन डे विश्वचषक क्रिकेट स्पर्धा संपूर्ण क्रीडाविश्वात अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. सध्या संपूर्ण जगभर तिचा ज्वर असून, लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वत्र क्रिकेटची क्रेझ पाहण्यास मिळत आहे.

आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक पाच वेळा विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. मार्च 2018मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत चेंडू कुरतडल्याप्रकरणी ‘कांगारू’ चांगलेच अडचणीत आले. याप्रकरणी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरॉन बॅनक्रॉफ्ट या तिघांवर काही काळ बंदी घालण्यात आली होती. जे ऑस्ट्रेलियाई खेळाडू विजिगिषु खेळीसाठी ओळखले जातात, त्यांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांना बाद करण्यासाठी चेंडूशी छेडछाड करणे ही बाब क्रिकेट जगताला पचनी पडली नाही. त्यानंतर ऑसी संघ हेलकावे खात होता. अखेर खेळाडूंवरची बंदी उठली आणि बघता बघता हा संघ पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. मोक्याच्या वेळी त्यांचा खेळ उंचावतो. म्हणूनच हा संघ  धोकादायक आहे.

ऑस्ट्रेलियाच्याही आधी मानाची ही स्पर्धा जिंकण्यासाठी दोन वेळचा विजेता भारतीय संघ प्रबळ दावेदार मानला जात होता. टीम इंडियानेही लौकिकाला साजेसा खेळ करीत उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तडाखेबंद सलामीवीर रोहित शर्मा, कर्णधार विराट कोहली फॉर्ममध्ये आहेत. मधल्या फळीची चिंता मात्र कायम आहे. दुसरीकडे गोलंदाजीत कमालीचा बदल झालेला जाणवतो. खासकरून मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यांनी आपली चमक दाखविली आहे. आता स्पर्धा जिंकायची असेल, तर एक-दोघांवर अवलंबून न राहता सर्वांनी योगदान द्यायला हवे.

भारताबरोबरच इंग्लंड विजेतेपदाच्या शर्यतीत आहे. या संघाने अलीकडच्या काळात कात टाकली आहे. क्रिकेटचे जनक असलेल्या इंग्लंडला आतापर्यंत एकदाही विश्वचषकावर आपले नाव कोरता आलेले नाही. हे शल्य दूर करण्याची नामी संधी त्यांना चालून आलेली आहे. सांघिक खेळाच्या जोरावर त्यांनी चांगले प्रदर्शन घडविल्याचे दिसून येते. यजमान असल्याने खेळपट्ट्यांची पुरेपूर माहिती आणि घरच्या मैदानावर दर्शकांचा भरघोस पाठिंबा या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. अर्थात, जिंकण्यासाठी दर्जेदार खेळ केल्यावाचून कुणालाही

पर्याय नाही.

गतवेळचा उपविजेता न्यूझीलंड संघ यंदा नव्या जोमाने स्पर्धेत उतरलेला आहे. विश्वचषक पटकाविण्यात इंग्लंडप्रमाणेच ‘किवीं’चीही पाटी कोरी आहे. मागील वेळी न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाकडून अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. ती कसर ते या वेळी भरून काढून नवा जगज्जेता बनतील का, हे पाहणे रंजक आणि तितकेच औत्सुक्याचे ठरणार आहे.

साखळी सामने पार करून चार दिग्गज संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. आता विश्वचषक त्यांच्यापासून अवघी दोन पावले दूर आहे. या निर्णायक लढतींमध्ये प्रत्यक्ष मैदानावर कोणता संघ कशी कामगिरी करतो यातूनच यंदाचा विश्वविजेता ठरेल, हे वेगळे सांगायला नको!

-समाधान पाटील (मो. क्र. 9004175065)

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply