Breaking News

दिल जवाँ हो, तो बेबसी कैसी.. सफेद बालों की ऐसी की तैसी..!!

कुठेतरी या ओळी वाचल्या आणि मला केसांवर काहीतरी लिहावं असं वाटू   लागलं… केस (अर्थात पुरुषांचे. स्त्रियांच्या केशसांभारावर ग्रंथच्या ग्रंथ लिहिले गेलेत) शरीराच्या शीर्षभागी असूनही त्यावर फार काही लिहिलं गेलं नसावं असं मला वाटतं. माझे केस लवकर गेले आणि उरलेले त्याही अगोदर पिकले. मी केस रंगवायचा प्रयत्न केला, नाही असं नाही, पण का कोण जाणे, मला ते जमलं नाही. अर्थात केस रंगवण्याचा प्रयत्न पत्नीच्या आग्रहास्तव केला होता, कारण माझे गेलेले आणि शिल्लक असलेल्यापैकी बहुतेक सर्व पिकलेले केस माझ्यापेक्षा तिलाच ‘कसेतरी’ वाटायचे… वयापेक्षा मोठा दिसतोस म्हणे…! (आता वयानं मोठं दिसण्याचे काय काय फायदे असतात तिला काय सांगणार…!)

मी केस रंगवायचे सोडले कारण तसं करणं मला खूप कटकटीचं वाटलं. केस कमी असले की अगदी एक एक केस पकडून रंगवावा लागतो आणि ते कल्पनेतही अवघड असतं, तर प्रत्यक्षात काय उपद्व्याप असेल याचा विचार करा… सरसकट रंग फासला की तो रंग डोक्यावरील उरलेल्या केसांऐवजी नेमका केस नसलेल्या ठिकाणीच व्यवस्थित लागतो आणि मग ते ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ सिरीयलमधल्या गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी श्रीयुत आत्माराम तुकाराम भिडेंच्या रंगवलेल्या टकलासारखं काहीतरी विचित्र दिसतं. त्यापेक्षा केस न रंगवलेलेच बरे असं म्हणून आहेत तसे ठेवणे योग्य हा निर्णय मला (नाईलाजाने) घ्यावा लागला.

तरी अनेक लोक केस रंगवतात. मुंबईसारख्या धकाधकीचं जीवन जगायला लागणार्‍या शहरात तर सततच्या टेन्शनने आणि निकृष्ट खाण्या-पिण्यामुळे अनेकांचे तरुण वयातच केस पिकतात. दुसरं म्हणजे, मुंबई हे व्यापारी शहर असल्यानं, इथं आतल्या वस्तूपेक्षा ‘पॅकिंग व वेष्टना’ला जास्त महत्त्व असतं. आतील वस्तू फालतू असली तरी चालेल, परंतु पॅकिंग मात्र आकर्षक हवं. हा व्यापाराचा नियम मुंबईसारख्या शहरात मानवी व्यवहारातही लागू होत असल्यामुळे इथं प्रत्येकाला प्रेझेंटेबल राहावं लागतं. दिसण्यावरूनच इथं व्यक्तीची किंमत केली जाते. मग ती व्यक्ती प्रत्यक्षात कशीही असेना का. त्यामुळे अकाली पिकलेले केस रंगवणं ओघानेच आलं.

माणसाचं सौंदर्य मुख्यतः नाक आणि डोळे यावर ठरतं. म्हणून तर ‘कानी-कपाळी सुंदर’ न म्हणता ‘नाकी-डोळी सुंदर’ असं म्हणतात. पूर्वी नाक धारदार (किंवा लिंगपरत्वे चाफेकळी) व डोळे पाणीदार (किंवा लिंगपरत्वे बोलके, भावूक) असले की माणूस सुंदर दिसायचा. आता त्यात आणखी दोन गोष्टींची भर पडली, त्या म्हणजे रंग आणि केस. हे टीव्हीमुळे कळलं…! नाक-डोळे-रंग-केस हवे तसे आणि हवे तिथं नसूनही केवळ साबणामुळे सौंदर्य खुलतं हा आणखी एक क्रांतिकारी शोधही अलीकडं लागलाय, हे ज्ञानही टीव्हीमुळे मिळालं…! टीव्ही नसता तर सुंदर कशाला आणि कुणाला म्हणावं कळलंच नसतं कधी बुवा…!!

थोड्याशा विषयांतरानंतर पुन्हा माझ्या नसलेल्या आणि उर्वरित पिकलेल्या केसांकडे वळू. केस रंगवायचा मला कंटाळा का येतो त्याचं मुख्य कारण मी वर सांगितलंच आहे. मी माझे जाऊन उरलेले केस रंगवत नाही याला आणखी एक कारण आहे. निसर्गाने आपल्याला (वयानुरूप) जे जे दिलेलं असतं, ते ते आपल्याला शोभेसं असतं यावर माझा ठाम विश्वास आहे. आपण सर्वच जर निसर्गाची (काही जण देवाची म्हणतील. हरकत नाही. दोन्ही एकच आहेत…!) युनिक निर्मिती असू, तर ती सुंदरच असणार अशी माझी खात्री आहे. म्हणून जर त्यांने केस काढून घेऊन उरलेले पांढरे केले असतील, तर ते आपल्याला शोभतच असणार. त्यांने पांढरे केलेले पुन्हा काळे करून त्या निसर्गाच्या कारागिरीत ढवळाढवळ आपण का म्हणून करावी…? अर्थात हे माझं मत झलं, इतरांना पटावं अशी बिलकूल अपेक्षा नाही.

टक्कल, अर्धटक्कल (पुढून असल्यास ‘भव्य कपाळ’ आणि मधेच असल्यास ‘श्रीमंत’, अशी त्या व्यक्तीला कॉम्प्लिमेंट दिल्यास, तिलाही बरं वाटतं), पूर्ण टक्कल आणि संपूर्ण पांढरे, परंतु भरघोस केस (सुतरफेणी नजरेसमोर आणा) हे पुरुषांच्या माथ्यावरील केसांचे ढोबळ मानाने चार प्रकार. हे वेगवेगळे प्रकारही एकेकाला काय शोभून दिसतात…!! पिकलेल्या केसाचा अमिताभ अजूनही किती देखणा आणि भारदस्त दिसतो… पूर्ण टक्कल असलेला राकेश रोशन, विगपेक्षा टकलातच देखणा वाटतो अजूनही…! अनुपम खेर, विनोद खन्नाचा मुलगा अक्षय खन्ना कुठं वाईट दिसतात? अरुण जेटली, मोदी काय कमी देखणे वाटतात? इंदिरा गांधींच्या केसातली ती ठसठशीत रुंद पांढरी बट तर नंतर नंतर त्यांची ओळख झाली होती. ही सर्वांना माहीत असलेली काही उदाहरणं. अशी कुठलीही रंगरंगोटी किंवा लपवाछपवी न करता ‘दिधले अनंते’ वृत्तीने बिनधास्त राहणारी कितीतरी आनंदी माणसं आपण आपल्या आजुबाजूला रोज पाहत असतो.

लपवाछपवीवरनं मला आठवतो तो सुपरस्टार रजनीकांत. आज भारतातल्या सर्वभाषिक चित्रपट नायकांमधे सर्वाधिक मानधन घेणारा आणि तेवढाच लोकप्रियही असणारा साऊथचा चित्रपट सितारा, पण चित्रपटाव्यतिरिक्त तो त्याच्या काळ्या रंगाच्या टकलासहीत लुंगीवर बिनधास्त वावरत असतो. चित्रपटातलं खोटं जग आणि प्रत्यक्ष जीवनातलं वास्तव यातील फरक समजणारा आणि कृतीतही उतरवणारा माझ्या माहितीतला हा एकमेव सुपरस्टार. नो लपवाछपवी, जसा आहे तसा…!

स्वतःला ते आहेत तशी प्रेझेन्ट करणारी खूप कमी माणसं असतात. बहुतेकांची धडपड आपण प्रत्यक्षात नसतो तसंच दाखवण्याची असते. त्यात काही चुकीचं असंही नाही कारण ती काळाची मागणी आहे. पॅकिंगला महत्त्व आल्यावर आणखी काय होणार? पण असं करून चालणार नाही. असं केल्याने तरुण वयातच डायबेटीस, ब्लडप्रेशर, हार्टअ‍ॅटॅक येणारच. हे सर्व अनावश्यक स्ट्रेसचेच मेन इफेक्ट्स आहेत. त्यामानाने केस लवकर पांढरे होणं हे साईड इफेक्ट्स खूपच सौम्य आहेत. केस झाले तर झाले पांढरे, गेले तर गेले काळजी कशाला! दिल जवाँ हो, तो बेबसी कैसी… सफेद बालों की ऐसी की तैसी… म्हणायचं आणि दिलाचं जवाँपण जपायचं. ‘दिसणं’ नव्हे तर आहोत तसं ‘असणं’ महत्त्वाचं असतं हे उमजायचं आणि पांढर्‍या (अन् गेलेल्याही) केसांची ऐशी की तैशी म्हणायचं. समोर येईल त्या परिस्थितीशी (आणि जमलंच तर ‘ती’च्याशी) जुळवून घेत ऐश करायची, काय?

-नितीन साळुंखे (मो. क्र. 9321811091)

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply