लंडन : वृत्तसंस्था
विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश संघाविरुद्धच्या सामन्यात विजय मिळविल्यानंतर पाकिस्तान संघातील खेळाडू शोएब मलिकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मी हा निर्णय घेण्याचे वर्षापूर्वीच ठरवले होते, असे मलिकने पत्रकार परिषदेत सांगितले.
शोएबने ट्विटरवरूनही याबद्दल माहिती दिली. ‘आज मी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. त्या सर्व खेळाडूंना धन्यवाद, ज्यांनी मला साथ दिली. त्या सर्व प्रशिक्षकांचे आभार, ज्यांनी मला प्रशिक्षित केले. त्याचबरोबर कुटुंब, मित्र, चाहतते, मीडियाचेही आभार!
35 कसोटी, 287 एकदिवसीय आणि 111 टी -20मधील अनुभवी खेळाडू शोएब मलिकने 20 वर्षांच्या करियरनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यंदाच्या विश्वचषकात त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. भारताविरुद्धच्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता.