लंडन : वृत्तसंस्था
बांगलादेशचा डावखुरा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनने अखेरच्या साखळी सामन्यातही आपला धडाकेबाज फॉर्म कायम राखला. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अर्धशतक झळकावताना शाकीबने माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा 50पेक्षा अधिक धावा करणार्या फलंदाजांच्या यादीत शाकीबने सचिनला मागे टाकले आहे.
2003 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सचिनने 11 डावांमध्ये सात अर्धशतकी खेळी केल्या होत्या, तर यंदाच्या स्पर्धेत शाकीबने आठ डावांमध्ये सात वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. त्याच्या या आकडेवारीवरून यंदाची स्पर्धा त्याच्यासाठी किती लाभदायी गेली आहे याचा अंदाज येतो. याचसोबत या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या आठही सामन्यांमध्ये शाकीबने 40 ही धावसंख्या ओलांडली आहे. विश्वचषक इतिहासात अशी कामगिरी करणारा शाकीब पहिला फलंदाज ठरला आहे.
अलीनेही टाकले सचिनला मागे
अफगाणिस्तानच्या संघाचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानवर मात केली. या सामन्यात अफगाणी इक्रम अलीने 86 धावांची खेळी केली. या कामगिरीसह तो विश्वचषक इतिहासात सर्वात कमी वयात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडुलकरने 18व्या वर्षी 1992च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये
न्यूझीलंडविरुद्ध 84 धावा केल्या होत्या. अलीने हा विक्रम आपल्या नावे केला.