Breaking News

एव्हरेस्टवरील कचर्याचं पुढे काय होतं?

काठामांडू : वृत्तसंस्था  – जगातील जवळपास प्रत्येक गिर्यारोहकासाठी एक लक्ष्य असणार्‍या माऊंट एव्हरेस्ट या पर्वतासाठी नेपाळ या राष्ट्राकडून एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. या पर्वतावर साठलेल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी म्हणून नेपाळतर्फे एक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. ज्याअंतर्गत आतापर्यंत या महाकाय पर्वतावरून 10 हजार किलो कचरा उचलण्यात आला आहे.

स्थानिक वृत्तसंस्था ‘सिन्हुआ’कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सरकार आणि काही खासगी संस्थांनी एकत्र येत बेस कॅम्प आणि उंचीवर असणार्‍या चार शिबिरांतील शेर्पांच्या सहाय्याने या मोहिमेची सुरुवात केली. ज्याअंतर्गत फक्त कचराच नव्हे, तर माऊंट एव्हरेस्टवर असणार्‍या मृतदेहांनाही योग्य स्थळी नेण्यात आलं.

एव्हरेस्टवरून एकत्रित करण्यात आलेले हे सर्व टाकाऊ पदार्थ काठमांडूपाशी असणार्‍या डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकण्याऐवजी त्यांच्यापासून विविध उत्पादनांसाठीचा कच्चा माल तयार करण्यासाठी त्यांचा वापर केला गेला. ज्यानंतर त्या वस्तू पुनर्वापरालायक झाल्या. सिन्हुआच्या वृत्तानुसार ‘ब्लू वेस्ट टू व्हॅल्यू’चे प्रमुख नवीन विकास महारजन यांनी याविषयीची विस्तृत माहिती दिली. ‘आम्ही सर्व सामग्रीची प्रथमतः प्लॅस्टिक, काच, अ‍ॅल्युमिनियम आणि कापड अशा विविध भागांत विभागणी केली. एकत्र करण्यात आलेल्या 10 टन कचर्‍यापैकी दोन टन कचर्‍याचा वापर करण्यात आला, तर उर्वरित गोष्टींमधील बराच भाग हा वापरण्योग्य नाही,’ असंही ते म्हणाले. 2017 पासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत आता अनेकांनीच योगदान देण्यास सुरुवात केली. कचर्‍याचा सदुपयोग करत त्यातूनही काही उपयुक्तच गोष्टी साकारता येऊ शकतात हे या मोहिमेच्या माध्यमातून यशस्वीपणे मांडण्यात आलं. एव्हरेस्टच्या दृष्टीनेही ही अत्यंत महत्त्वाची बाब असून, इतरही विविध ठिकाणांवर अशी मोहीम राबवल्यास नैसर्गिक वारसाही नक्कीच जपता येईल.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply