पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात शास्त्रार्थ या आशयाखाली राष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धा 21 ते 23 मार्चदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत गोवा, बंगळुरू, चेन्नई, नागपूरसारख्या देशभरातील विविध विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश विजय अचलिया, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, अध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव डॉ. एस.टी. गडदे, कार्यकारी मंडळ सदस्य अर्चना ठाकूर, अॅड. विनायक कोळी, अॅड. राहुल घरत, प्राचार्य सानवी देशमुख आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आणि अशा स्पर्धांचे कायदेशीर ज्ञान वृद्धीकरणात व भविष्यकाळातील कायदेशीर व्यावसायिक घडवण्यात असलेले महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे स्पर्धकांना त्यांच्या कायदेशीर प्रवासात पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली.
शास्त्रार्थ या राष्ट्रीय स्तराचे मूट कोर्ट स्पर्धेसाठी एक प्रतिष्ठित कायदेशीर तज्ज्ञांचे पॅनेल नियुक्त करण्यात आले आहे. सकाळच्या शिफ्टमध्ये न्यायाधीश म्हणून स्वप्नील पाटील, अश्विन सिंग, अश्विन आडवानी, वैभव घाटके, निलेश बागडे, सोनिया पवार, इंद्रजीत भोसले, भक्ती दळवी या वकिलांचा समावेश होता; तर दुपारच्या शिफ्टमध्ये न्यायाधीश म्हणून सुजय, लक्षणा पाट्याल, पूजा भोसले, सागर पसपोहे, शुभांगी झीटे, धनिष्ठा कावले, मोहनसिंग राजपूत, हृषिकेश वाणी या वकिलांचा समावेश होता. तत्पूर्वी 21 मार्च रोजी एक रिसर्चर टेस्टदेखील घेतली गेली, ज्यामुळे सहभागींना एक शैक्षणिक आव्हान दिले गेले आणि त्यांना आगामी कडक फेर्यांसाठी योग्यरीत्या तयार करण्यात आले. या स्पर्धेने वकिलांना त्यांची कौशल्ये सादर करण्यासाठी आणि कायदा क्षेत्रातील अमूल्य अनुभव मिळवण्यासाठी एक अनोखा मंच प्रदान केला गेला आहे.
कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य सानवी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक अपराजिता गुप्ता यांनी केले. या स्पर्धेत देशभरातील सहभागी स्पर्धक आपल्या वकिली कौशल्यांचे प्रदर्शन करीत असून युवा वकिलांना अमूल्य न्यायालयीन अनुभव मिळविण्याची, कायदेशीर व्यावसायिकांशी नेटवर्किंग करण्याची आणि राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा दाखवण्याची ही एक उत्तम संधी ठरली आहे.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर समाजसेवेतील हिरा -आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या मूट …
RamPrahar – The Panvel Daily Paper