पनवेल ः रामप्रहर वृत्त
संपूर्ण भारतात 1 जुलै म्हणजेच ज्या दिवशीपासून जीएसटी करप्रणाली अंमलात आणण्यात आली, तो दिवस जीएसटी दिन म्हणून केंद्र सरकारच्या वतीने साजरा करण्यात येतो. या वर्षी कमिशनर ऑफ सेंट्रल रायगड कार्यालयामार्फत जीएसटी दिन सीकेटी विद्यालयात साजरा करण्यात आला.
भारताच्या भावी पिढीला जीएसटीबाबतचे ज्ञान व्हावे, देश सजग व्हावा आणि याचे फायदे विद्यार्थ्यांना समजावेत, या उद्देशाने या कार्यालयामार्फत सीकेटी इंग्रजी माध्यमातील 10वीच्या विद्यर्थ्यांसाठी निबंध स्पर्धा तसेच 7वी, 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
’एक देश एक कर’ या विषयावर चित्रकला स्पर्धा घेतली गेली. जीएसटी आणि त्याचे महत्व आणि ’एक देश एक कर’ याचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम असे निबंध स्पर्धेचे विषय होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या दोन्ही स्पर्धेत सहभाग घेतला. कमिशनर ऑफ सेंट्रल जीएसटी, रायगड कार्यालयाचे अधिक्षक सतिश सावंत, सहाय्यक आयुक्त भूषेंद्र सावंत, निरीक्षक अतिनकुमार हे प्रतिनिधी स्पर्धेदरम्यान उपस्थित होते. अतिशय नियोजनबद्धरितीने या स्पर्धा पार पाडल्याबद्दल या प्रतिनिधींनी मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांचे आभार मानले. इंग्रजी निबंध स्पर्धेत सिध्दी सुभाष म्हस्कर, अमृता चंद्रकांत जाधव, ईशा दीपक तारेकर, अदिती अजित पाटील, अदित्य राजेंद्र मोरे, सृष्टी संजय म्हात्रे, हिंदी निबंध स्पर्धेत ईश्वरी राजेंद्र म्हस्के, तृप्ती विलास सरगर, उषा बापू कांबळे, अवधुत सचिन घरत, तर चित्रकला स्पर्धेत श्रध्दा सचिन सोनावले, श्रेया संतोष म्हात्रे, भूमिका ग. गजोरे. यांनी सुयश मिळविले, त्यांचे अभिनंदन होत आहे.