उरण ः वार्ताहर
सेबी (भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड) व महिला आर्थिक महामंडळ रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने उरण नगर परिषद येथे (दि. 2 ते 4) असे तीन दिवस महिला बचतगटासाठी वित्तीय शिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सेबीच्या वतीने अशोक पवार यांनी महिला बचत गटांना, तसेच नगर परिषद कर्मचारी यांना आर्थिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी महिलांची मोठ्या प्रमाणत उपस्थिती होती.
या कार्यक्रमात आर्थिक शिक्षण म्हणजे काय, बचतीचे महत्त्व, सुरक्षित गुंतवणुकीच्या बँका, पोस्ट ऑफिसच्या योजना, त्यात सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, अटल पेन्शन योजना, पंतप्रधान विमा संरक्षण योजना, फोनवर आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी येणारे कॉल्स, यांची सविस्तर माहिती देण्यात आली, तसेच दुप्पट परताव्याच्या फसवणुकीच्या योजनांना बळी न पडता याबाबत सेबीच्या हेल्पलाईन (1800227575 /18002667575) नंबरवर तक्रार करावी. कुठलीही गुंतवणूक करतांना काळजीपूर्वक गुंतवणूक करण्याचे अवाहन अशोक पवार यांनी केले.
महिला बचत गटांसाठी खाती उघडून सर्वतोपारीने मदत केली जाईल, कर्ज कशाप्रकारे दिले जाईल, कर्जाची किमान व कमाल किती रक्कम दिली जाईल, कर्ज कसे व अटी कोणत्या असतात, अशी अत्यंत उपयुक्त माहिती अपना सहकारी बँकचे व्यवस्थापक सुदाम चव्हाण यांनी दिली. या वेळी महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वयक वर्षा पाटील, उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली सविन म्हात्रे, सेबी संस्थेच्या सुषमा दास, अशोक सुर्वे, सहयोगिनी कविता म्हात्रे, बचत गटाच्या संपूर्णा थळी, अपना सहकारी बँक उरण शाखाचे मॅनेजर सुदाम चव्हाण, तसेच महिलावर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता. या कार्यशाळेतून महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्याचे संपूर्णा थळी यांनी सांगितले.