Thursday , March 23 2023
Breaking News

पावसामुळे रायगडातील जनजीवन विस्कळीत

अलिबाग : प्रतिनिधी – गेले काही दिवस संततधार पडणार्‍या पावसाने रविवारी रात्रीपासून जोरदार बरसत रायगड जिल्ह्याला पुन्हा एकदा झोडपून काढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले. जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये पाणी शिरून नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली. काही ठिकाणी सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसानही झाले आहे. दरम्यान, संबंधित ठिकाणचे प्रशासन सतर्क झाले असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सडवली आदिवासीवाडीत दोन घरे कोसळली

पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील सडवली ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील आदिवासीवाडीमध्ये रविवारी (दि. 8) रात्री झालेल्या संततधार पावसामुळे दोन स्थलांतरीत आदिवासी भावंडांची एकमेकांशेजारी बांधलेली घरे कोसळून सुमारे 90 हजारांहून अधिक नुकसान झाले. मात्र, स्थलांतरामुळे या दोन्ही भावंडांच्या कुटूंबियांचा जीव वाचला आहे.

सडवली आदिवासीवाडीमध्ये सरपंच ताई पवार, उपसरपंच बापू जाधव तसेच अशोक जाधव आणि ग्रामसेविका त्रिशिला गंभीरे यांनी सोमवारी सकाळी अतिवृष्टीबाधित घरांची पाहणी केली असता रविवारी रात्री झालेल्या संततधार पावसामुळे किसन शिवराम कोळी या मयत आदिवासीच्या घरकुलाचे सहा सिमेंटचे पत्रे आणि उत्तरेकडील भिंत कोसळून नुकसान झाल्याचे दिसून आले. मात्र किसन कोळी या मयत इसमाची पत्नी, आई आणि मुलांनी रोजगाराच्या शोधात स्थलांतर केल्याने या घटनेत जिवितहानी टळल्याचे दिसून आले. या घराचे अंदाजे 43 हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे तलाठी अजय महाडीक यांनी सांगितले.

या घराशेजारीच त्याचा भाऊ वसंत शिवराम कोळी याचे घर असून तोदेखील त्याच्या बायका मुलांसह परगावी राहण्यास गेला आहे. रविवारी रात्रीच्या पावसात त्याचेही घर कोसळले. या घराचे अंदाजे 47 हजार 100 रूपयांचे नुकसान झाल्याचे तलाठी अजय महाडीक यांनी सांगितले.

नागोठण्यात पुन्हा एकदा संततधार

नागोठणे : प्रतिनिधी  – आठवडाभर काहीअंशी विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी सकाळपासून मुसळधार पडण्यास प्रारंभ केला आहे. नागोठणे शहरासह विभागात संततधार पाऊस पडत असल्याने गटारे पुन्हा एकदा ओसंडून वाहत असून, सखल भागात रस्त्यावर पाणी साचून राहात आहे. अंबा नदीसुद्धा दुथडी भरून वाहत असल्याने पावसाचा जोर असाच कायम राहिला तर, पूर भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहायला सुरुवात झाल्याने भातलावणीच्या कामाला काही प्रमाणात ’ब्रेक’ लागला आहे.

बंदी झुगारून हौशी पर्यटक सरसावले

झेनिथ धबधब्यावर लुटला वर्षासहलीचा आनंद

खोपोली : प्रतिनिधी  – धो धो कोसळणार्‍या पावसामुळे अनियंत्रित प्रवाह व दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेवून सुरक्षेचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने खोपोलीतील झेनिथ धबधबा परिसरात जाण्यास   जाण्यास बंदी घातली आहे. तरीही रविवारी (दि. 8) शेकडो हौसी पर्यटक आड मार्गाने झेनिथ धबधब्यावर पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पोहचले होते.

पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून खोपोलीतील झेनिथ धबधबा मुंबई-पुण्यातील तरुणांसाठी मोठे आकर्षण आहे. मात्र सतत कोसळत असलेला धो धो पाऊस व अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेत सुरक्षा उपाय म्हणून स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग व नगरपालिकेकडून येथील झेनिथ धबधब्यावर जाण्यास तूर्तास मज्जाव करण्यात आला आहे. यासाठी धबधबा परिसरातील प्रवेश रस्त्यावर  खोपोली पोलीस व नगरपालिकेकडून आवश्यक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. तरीही शनिवारी व रविवारी असंख्य पर्यटक धबधब्याजवळ पोहचल्याचे दिसून आले. मात्र पावसाळी पर्यटनाचा आनंद घेतांना प्रशासकीय सूचनांचे पालन करावे, असे  आवाहन प्रशासनकडून करण्यात आले आहे.

खोपोलीसह खालापुरात पाणीच पाणी

लौजी स्टेशनजवळ रेल्वे रुळ पाण्याखाली

खालापूर : प्रतिनिधी  – खोपोली खालापुरात सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत पडलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. खोपोली-पेण मार्गावरील सारसन गावाजवळ असणार्‍या अलाना कंपनीजवळ, पेट्रोल पंपासमोर रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने हा मार्ग काही काळ बंद ठेवण्यात आला होता. तर मिलगाव शिळफाटा येथील रस्ताही पाण्याखाली गेला होता. शिळगावात मशिदीच्या मागील  घरात पाणी शिरल्याने घरातील संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले तर खोपोलीच्या सिद्धार्थनगरमधील काही घरातही पाणी शिरले.

खोपोली रेल्वे स्थानकाजवळ विहारी गावात जाणार्‍या जुन्या पुलावरून पाणी वाहून जात असल्याने तेथील रहिवाशांना खबरदारीचा इशारा देण्यात आला होता. तर लौजी रेल्वे स्थानकाजवळ नव्याने उभ्या  राहत असणार्‍या रहिवासी संकुलाच्या बांधकामासाठी माती भराव केल्याने या स्थानकाला तलावाचे  रूप आले आहे. डोंगरावरुन वाहून आलेले पाणी जाण्यास मार्ग नसल्याने लौजी गावाला वळसा घेवून हे पाणी रेल्वे रूळावर होते.

त्यामुळे रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेली तर लौजी स्थानकासमोरील श्रीराम नगरमधील काही घरांत पाणी शिरल्याने घरातील सामान व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे मोठे नुकसान झाले

माणगावमध्ये काळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली

माणगाव : प्रतिनिधी – तालुक्यात रविवारी (दि. 7) मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाने थैमान घातले असून, त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील सुमारे 100हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. माणगावातून वाहणार्‍या काळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर काळ नदीला जोडणारी गोद नदी तुडूंब भरुन वहात आहे. माणगावमधील अनेक घरांमध्ये व काही दुकानांत पाणी शिरले. पावसाचा अतिजोर पाहता सोमवारी माणगावमधील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. आपत्कालीन यंत्रणेने व माणगाव नगरपंचायतीने नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.

तालुक्यातील इंदापूर, साई, गोरेगाव, निजामपूर, विळे, पाटनूस, भिरा, पळसगाव, लोणेरे, खरवली, मोर्बा, भागात जोरदार अतिवृष्टी सुरु होती. माणगाव-मोर्बा, माणगाव-निजामपूर, बामणोली रोड, माणगाव कचेरी रस्त्यासह नगरपंचायत हद्दीतील भागात व अनेक खेड्यातील रस्त्यांवर पाणी तुंबले होते. माणगाव-मोर्बा रोडवर असणार्‍या पेट्रोल पंपाजवळ भराव झाल्याने शेतातील पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग राहिला नाही. त्यामुळे  या भागातील घरे व छोट्या दुकानांत पाणी शिरले होते. माणगाव येथील रेल्वेपुलाखाली रस्त्यावर पाणी साठले होते.

दरम्यान, माणगाव उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर तसेच  तहसीलदार प्रियांका आयरे कांबळे यांनी    आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply